पणजी : महाराष्ट्रात प्रदीर्घ वाद-विवाद आणि चर्चेनंतर मंजूर झालेला अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचा कायदा गोव्यातही व्हावा यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे (अंनिस) प्रयत्न केले जाणार आहेत. अंनिसचे संस्थापक आणि संयोजक श्याम मानव यांनी येथे शनिवारी ही माहिती दिली. श्री. मानव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांच्यासमवेत कार्यकर्ते प्रवीण गांगुर्डे, शशी गमरेही होते. मानव ‘लोकमत’चे संपादक राजू नायक यांच्याशी या कायद्याच्या अनुषंगाने विविध पैलूंवर सविस्तर चर्चा केली. गोव्यातील लोक सुशिक्षित आहेत. अनेक घडामोडींवर ते प्रतिक्रिया देतात. अशा प्रदेशात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची तीव्र गरज आहे. त्यासाठी गोव्यात सामूहिक वातावरणनिर्मिती झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांची चांगली फळी उभी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात हस्तक्षेप करावयाचा नाही, तर सामान्य माणसाला बदलवायचे आहे. कारण त्यांचे स्वातंत्र्य पुन्हा हिरावून घेतले जाईल, अशी आजची स्थिती आहे. सामान्यांचा आवाज दडपण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रात झालेला कायदा आहे तसा गोव्यास लागू होतो, असे सांगून ते म्हणाले, ज्या वृत्तींनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली त्यांच्याविरोधात मोठी लढाई करावी लागेल. महाराष्ट्रापेक्षा गोव्यात ही लढाई लहान राज्यामुळे तुलनेत सोपी आहे. त्यानंतर कायद्यासाठीच्या आग्रहाचे मार्ग अवलंबवावे लागतील. कायद्याविषयी लोकांचे प्रबोधन करावे लागेल. कायदा झाला की सरकारला मग फारकाळ मागे राहता येत नाही. अंमलबजावणी करावी लागते. त्यासाठी सजग जनमत तयार करण्याचे काम अंनिस सतत करत राहील.
‘अंनिस’चे आता गोव्यावर लक्ष
By admin | Updated: June 29, 2014 02:02 IST