केपे : कसमय-सुळकर्णा येथील विष्णू गावकर (६0) यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावकर सकाळी ८.३0 वाजण्याच्या सुमारास आपल्या कामगाराबरोबर मुख्य रस्त्यापासून ५00 मीटर आत जंगलात असलेल्या पायकदेवाची पूजा करण्यासाठी गेले असता, अचानक कुणी तरी पाठीमागून बंदुकीतून गोळ्या झाडल्या. डोके, पाय, पाठ व खांद्यात गोळ्या घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. सोबत असलेल्या कामगाराने त्यांना त्वरित उचलून घरी आणून प्रथम १0८ रुग्णवाहिकेतून काकोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी मडगावच्या हॉस्पिसियो इस्पितळात व नंतर बांबोळीच्या गोमेकॉत दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती केपे पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक राम आसरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गोळीबार करणाऱ्याचा शोध घेण्यासाठी श्वानपथक तसेच ठसे तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. केपे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध प्राणघातक हल्ला व बेकायदा शस्त्र बाळगणे या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. (प्रतिनिधी)
अज्ञाताच्या गोळीबारात वृद्ध गंभीर
By admin | Updated: July 1, 2014 01:43 IST