पणजी : बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर सरकारने गुरुवारी हातोडा उगारला. वाळू उपशासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बुधवारी (दि.३ ) घेतलेल्या बैठकीनंतर ही कारवाई झालेली आहे. धडक कारवाईत म्हापसा पोलिसांनी वाळूचे सहा ट्रक पकडले. सरकार अधिकृतपणे परवाने देईपर्यंत ही कारवाई चालूच राहाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. वाळू उपशासाठी सरकारने जी ठिकाणे विचारात घेतली आहेत त्यातील दक्षिण गोव्यातील काही ठिकाणांची गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाने तपासणी पूर्ण केलेली आहे. येत्या सोमवारी अखेरची तपासणी होणार असून दोन आठवड्यांत सर्व अर्ज निकालात काढू, असे सदस्य सचिव श्रीनेत कोटवाले यांनी सांगितले. गोव्यात हाताने वाळू उपसा केला जात असल्याने पर्यावरणीय परवान्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली आणि त्याबाबत सूट मिळावी, अशी विनंती केंद्र सरकारकडे केली; परंतु केंद्राकडून उत्तर आलेले नाही. ५ ते २५ हेक्टरपर्यंत लिज क्षेत्रात वाळू उपशासाठी पर्यावरणीय परवाना देण्याचे अधिकार राज्य सरकारच्या अखत्यारित येतात, त्याचा आधार घेऊन लहान लिज क्षेत्रांना परवाने दिले जातील. त्यासाठी इच्छुक अर्जदारांनी जिल्हाधिकारी तसेच खाण खात्याकडे अर्ज करावे लागतील, असे सांगण्यात आले.
बेकायदा वाळूप्रश्नी कारवाई
By admin | Updated: June 5, 2015 01:49 IST