मडगाव: कुत्रा आडवा आल्याने दुचाकी वरुन खाली पडलेल्या रेवोनिको फर्नांडीस (४१) या दुचाकी चालकाचे गोमेकॉत आज शुक्रवारी निधन झाले. गोव्यातील दक्षिण गोव्यामधील बाराडी वेळ्ळी येथे गुरुवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अपघाताची वरील घटना घडली होती. मयत काणकोणच्या आगोंद येथील आहे.
फर्नांडीस हा रावणफोंड येथील मिलिटरी कॅम्पमध्ये स्लीपर्सचे काम करीत होता. पहाटे तो आपल्या ॲक्टीवा दुचाकीवरुन कामाच्या ठिकाणी जात असताना त्याला अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी झाला होता. नंतर त्याला गोमेकॉत हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरु असताना त्याला मरण आले. अपघाती मृत्यू म्हणून कुंकळ्ळी पोलिसांनी वरील प्रकरण नोंदवून घेतले आहे. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कविता रावत पुढील तपास करीत आहेत. शवचिकित्सेनंतर मृतदेह मयताच्या कुटुबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.