सद््गुरू पाटील ल्ल पणजी सरकारच्या नागरी पुरवठा खात्याने येत्या दि. १ आॅगस्टपासून राज्यातील सुमारे अडीच लाख रेशनकार्डांची छाननी करण्याची विशेष मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या बाजूने या खात्याने अन्न सुरक्षेसाठी अर्ज केलेल्या व्यक्तींपैकी ८ हजार रेशनकार्डधारक कुटुंबांना या योजनेच्या लाभातून वगळले (अपात्र ठरवले) आहे. अशा प्रकारे आणखी १० ते १२ हजार कुटुंबे अर्जांच्या छाननीअंती अपात्र ठरणार आहेत. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभासाठी एकूण १ लाख ४० हजार लोकांनी आतापर्यंत अर्ज केले. अजूनही अर्ज येणे सुरूच आहे. शनिवार व रविवारीही नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी तालुका पातळीवर अर्ज स्वीकारण्याचे काम करतात. सध्या १ लाख ४० हजार व्यक्तींचे अर्ज खात्याकडे आले. त्यापैकी ३० हजार अर्जांची छाननी करण्यात आली व त्यातून ८ हजार अर्ज हे अन्न सुरक्षेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आले; कारण या योजनेच्या लाभासाठी पात्र ठरण्याकरिता जी कागदपत्रे सादर करावी लागतात, ती कागदपत्रे हे आठ हजार अर्जदार सादर करू शकले नाहीत. आॅक्टोबरपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभाच्या कक्षेबाहेर असलेल्या सुमारे अडीच लाख रेशनकार्डांची येत्या महिन्यात छाननी केली जाईल. छाननीवेळी प्रत्येकाकडे आधारकार्ड मागितले जाईल. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, त्यांना निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन परवाना अशा बारापैकी एखादा पुरावा सादर करावा लागेल. यापैकी काहीच सादर न करणाऱ्यांचे रेशनकार्ड रद्द केले जाईल. इतर सर्वांना नवी रेशनकार्डे दिली जातील, असे संचालक विकास गावणेकर म्हणाले. सध्या रेशनकार्डांची एकूण संख्या ४ लाख ३ हजार आहे. अन्न सुरक्षा योजनेच्या लाभाच्या कक्षेत एकूण पाच लाख लोकसंख्या येते. गृह आधार, अंत्योदय अशा योजनेच्या लाभार्थींना अन्न सुरक्षेचा लाभ मिळेल.
८ हजार कुटुंबे वगळली
By admin | Updated: July 16, 2015 01:58 IST