पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राज्यात ६६.४३ टक्के मतदान झाले. २0१0च्या निवडणुकीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. मंगळवारी रात्री साळ येथे भाजपचे महासचिव सतीश धोंड यांच्या मोटारीवर झालेली दगडफेक तसेच अन्य किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदारांमध्ये सकाळी निरुत्साहच दिसत होता. मात्र, दुपारनंतर ओघ वाढला. ५ लाख १८ हजार ५१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रिवण-सांगे येथे प्रसाद शशिकांत गावकर याच्याकडून ४५ हजार रुपये रोख जप्त करण्यात आली. मतमोजणी शुक्रवार २0 रोजी सकाळी ८ वाजता सुरू होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एम. मुदस्सीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवेगळ्या स्वरूपाच्या १0 घटना निवडणूक काळात घडल्या; परंतु त्या किरकोळ स्वरूपाच्या होत्या. रिवण येथील घटनेत प्रसाद याच्यासोबत गजानन राहिदास रायकर, रवींद्र पुंडलिक वेळीप व सुशांत गजानन गोवेकर हे अन्य तिघे होते. त्यांची जीए 0५ बी ९७३३ क्रमांकाची मोटार जप्त करण्यात आली आहे. प्रत्येकी चार पाकिटांमध्ये प्रत्येकी १0 हजार रुपये आणि एका पाकिटात ५ हजार रुपये घेऊन ते वरील मोटारीने निघाले होते. मतदान केंद्रात हे पैसे वाटण्यात येणार होते, असे मुदस्सीर म्हणाले. राजकीय पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांनी मोठी हवा केली असली, तरी मतदारांमध्ये मात्र निरुत्साहच दिसून आला. (पान ७ वर)
६६.४३ टक्के मतदान
By admin | Updated: March 19, 2015 01:18 IST