मडगाव : शहरात मलेरियाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाच्या बांधकामाच्या ठिकाणी बुधवारी सहा रुग्ण सापडले. पावसाने दडी मारलेली असताना मलेरियाने पुन्हा एकदा थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी मडगाव शहर आरोग्य केंद्राने या प्रकल्पाच्या एम. व्ही. आर. या बिल्डर आस्थापनाला नोटिस बजावल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. संजय दळवी यांनी दिली. काही दिवसांपूर्वी या भागात चार रुग्ण सापडले होते. त्या वेळीही आरोग्य विभागाने त्याची कडक दखल घेऊन कंत्राटदाराची कानउघाडणी केली होती. या बांधकामाच्या ठिकाणी राहात असलेले अनेक कामगार अन्य ठिकाणीही कामानिमित्त जात असल्याचेही आढळून आले आहे. या कामगारांकडे आरोग्यकार्डेही नाहीत. जवळपास शंभर कामगारांसाठी केवळ ४ शौचालये उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अनेक कामगार आपले नैसर्गिक विधी उघड्यावरच उरकत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरण्याबरोबरच रोगराई फैलावत असल्याची माहिती आरोग्य खात्यातील सूत्रांनी दिली. राज्यात मलेरियाचे प्रमाण वाढत आहे. २०१२ साली गोव्यात १७१४ मलेरियाचे रुग्ण सापडले होते, तर २०१३ साली रुग्णांची संख्या २३८८ इतकी होती. (प्रतिनिधी)
मडगावात आढळले मलेरियाचे ६ रुग्ण
By admin | Updated: July 3, 2014 01:17 IST