पणजी : लुईस बर्जर प्रकरणात चर्चिल आलेमाव यांना लाच देण्याच्यावेळी लाचेची रक्कम मोजण्यात आली, तेव्हा ४० हजार रुपये कमी मिळाले होते, अशी माहिती या प्रकरणात साक्षीदार म्हणून नोंदविण्यात आलेल्या साक्षीदारांनी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात नोंदविलेल्या साक्षीवरून उघड झाली आहे. ही लाचेची रक्कम आलेमाव यांच्या पणजीतील आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानातच देण्यात आली होती. सुरुवातीला आलेमाव यांना देण्यात आलेली लाच ही अत्यंत गुप्तपणे आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय देण्यात आली. त्या वेळी पैसे घेऊन लुईस बर्जर कंपनीचे तत्कालीन अधिकारी मालदीशिवराम प्रसाद आणि शहा कन्सल्टन्सीचे संचालक प्रसन्न शहा आले होते, तर दुसऱ्यावेळी जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर उपस्थित होते. प्रसाद यांनी पैशांच्या बॅगा आणल्या होत्या. या बॅगमध्ये ५००च्या व १००० रुपयांच्या नोटांची बंडले होती. लाचेची रक्कम १० लाख ते १५ लाख रुपये एवढी होती. प्रत्यक्ष जेव्हा पैशांची बंडले मोजण्यात आली, तेव्हा ४० हजार रुपये कमी मिळाले, असे प्रसाद यांनी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुली जबाबात स्पष्ट केले आहे. प्रसन्न शहा यांच्या घेतलेल्या कबुली जबाबात, त्यांनी आपण बॅगा घेऊन प्रसाद यांच्याबरोबर आलो होतो हे मान्य केले आहे; परंतु त्यात पैसे होते हे माहीत नसल्याचे म्हटले आहे. याच कबुली जबाबात प्रसाद याने इतर दोन व्यक्तींसह माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या मडगाव येथील निवासस्थानात पैसे दिल्याचे म्हटले आहे. (प्रतिनिधी)
लाचेच्या रकमेत आले ४० हजार रुपये कमी...
By admin | Updated: October 6, 2015 01:52 IST