लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : एका गोवा स्थित खासगी कंपनीचा चेअरमन असल्याचे भासवून तब्बल ९३.२१ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या नहिम खान (१९ वर्षे, हरयाणा) याला गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने अटक केली आहे. फसवणुकीचा प्रकार ३ ते ५ डिसेंबर २०२४ या कालावधीत झाला.
गोवा स्थित खासगी कंपनीचा चेअरमन असल्याचे भासवून नहिम याने त्याच कंपनीच्या सरव्यवस्थापकाशी व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संपर्क साधला. त्यानंतर संशयिताने बैठकीचे निमित्त सांगून तक्रारदार सरव्यवस्थापकाला विविध बँक खात्यांमध्ये ९३ लाख २१ हजार ४१४ रुपये पाठवण्यास सांगून त्यांची फसवणूक केली.
या प्रकरणातील संशयिताला सायबर गुन्हे विभागाच्या पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने ट्रेस केले. तो हरयाणा येथील हरिदाबाद येथे लपून बसल्याचे समजल्यानंतर विभागाचे उपनिरीक्षक शेरविन डिकॉस्टा, पोलिस कॉन्स्टेबल संजय नाईक व पोलिस कॉन्स्टेबल महेश नाईक यांच्या पथकाने संशयिताला अटक केली. सदर कारवाई ही सायबर गुन्हे विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष, पोलिस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
नहिमच्या तीन बँक खात्यात ७१ लाख रुपये
१९ वर्षांच्या नहिम हा मोठा ठकसेन निघाला. पोलिसांनी हरयाणा येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याची बँक खाती तपासली. यात एका बँक खात्यात ३३ लाख रुपये, दुसऱ्या बँक खात्यात ३१ लाख रुपये तर अन्य एका बँक खात्यात ७.५७ लाख रुपये, मिळून संशयिताच्या बँक खात्यात एकूण ७१ लाख रुपये आढळले. नहिमची तिन्ही बँक खाती गोठवण्यात आली आहेत.
लोकांनी दक्ष राहावे
व्हॉटसअॅपच्या माध्यमातून अशा प्रकारे सायबर गुन्हेगार लोकांची फसवणूक करीत आहेत. त्यासाठी व्हॉटसअॅपचे प्रोफाइल पिक्चर म्हणून ओळखीच्या लोकांच्या फोटोंचाही वापर केला जात आहे. त्यामुळे व्हॉटसअॅपवरून जर कुणी संपर्क साधला, तर पडताळणी करावी. बळी पडू नये, असे आवाहन सायबर गुन्हे विभागाने केले आहे.