पणजी : चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीवरून केंद्राने गोवा सरकारला २0१५-१६ या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय करातील वाट्याचा पहिला हप्ता म्हणून १४१ कोटी ५0 लाख रुपये मंजूर केले आहेत. यामुळे आर्थिक संकटातील गोव्याला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.गोव्याच्या वाट्याला आलेला हा निधी इतर लहान राज्यांच्या तुलनेत अल्पच आहे. मिझोरामला १७२ कोटी ४0 लाख, नागालॅण्डला १८६ कोटी ६८ लाख, मणिपूरला २३१ कोटी २७ लाख रुपये निधी पहिला हप्ता म्हणून मंजूर झालेला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच चौदाव्या वित्त आयोगाने केंद्रीय करांमध्ये राज्यांच्या वाट्यात १0 टक्के वाढ करण्याची शिफारस केली होती व केंद्र सरकारने ती स्वीकारली आहे, त्यानुसार आता तो मिळाला. वित्त खात्याचे संयुक्त सचिव मायकल डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या आर्थिक वर्षात कें द्रीय कराच्या वाट्याचे १९८१ कोटी रुपये केंद्राकडून गोव्याला मिळतील. याआधी दरमहा ७३ कोटी रुपये मिळत असत. हा आकडा आता १४२ कोटींवर पोहोचला आहे. आता दरमहा सुमारे ६९ कोटी रुपये जास्त मिळतील. गोव्याकडून केंद्राला प्राप्तीकर, सेवा कर तसेच अन्य केंद्रीय करांच्या रूपात दरवर्षी सुमारे १0 हजार कोटी रुपये प्राप्त होतात, अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान, राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने अलीकडेच सरकारने पेट्रोलवरील व्हॅट १0 टक्क्यांनी वाढवला. चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीमुळे केंद्रीय करातील गोव्याचा वाटा ९४१ कोटी रुपयांवरून १९८१ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. असे असले तरी तो पुरेसा नसल्याने महसूलवाढीसाठी अशा करांचा आधार सरकारला घ्यावा लागत आहे. (प्रतिनिधी)
केंद्राकडून १४१ कोटी
By admin | Updated: April 6, 2015 01:20 IST