लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जंगलामध्ये पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एटापल्ली तालुक्यातील रेकनार येथील सोनसू मिरचा उसेंडी याला सी-६० पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार करून त्याला नक्षलवादी घोषित केल्याचा आरोप करीत त्याचा नक्षलवाद्यांशी काहीही संबंध नाही, असा आरोप सोनसू उसेंडीच्या पत्नी जयको उसेंडी व वसंती उसेंडी यांच्यासह गावकºयांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून सी-६० पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली.सोनसू उसेंडी हा ३० मार्च रोजी शुक्रवारी जेवनाचा डबा, कुऱ्हाड, गुल्लेर व पक्षी पकडण्याचे जाळे घेऊन सकाळी ११ वाजता जंगलात गेला. सायंकाळ होऊनही परत न आल्याने सायंकाळीच जंगलात जाऊन शोध घेतला असता, सोनसूने पक्षी पकडण्यासाठी गुमडीच्या जंगलातील नाल्यात लावलेले जाळे गावकऱ्यांना दिसले. परंतु सोनसू मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी १ एप्रिल रोजी गावकरी सोनसू बेपत्ता असल्याची तक्रार देण्यासाठी कोटमी पोलीस मदत केंद्रात पोहोचले. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सोनसूचा पासपोर्ट व आधार कार्ड मागितला. पासपोर्ट बघितल्यानंतर तेथील पोलीस अधिकाऱ्यांनी गडचिरोली येथे जाऊन एसपी साहेबांना भेटा. पोलीस चकमकीत मरण पावलेला एक मृतदेह आहे, असे सांगितले. गावकरी त्याच दिवशी रात्री १० वाजता गडचिरोली येथे पोहोचले. रात्री १ वाजता मृतदेह दाखविला. मृतदेह हा सोनसू उसेंडीचाच होता.सोनसूला दोन पत्नी, चार मुले आहेत. गावात १० एकर शेतजमीन आहे. दोन ठिकाणी बँकेचे खाते आहेत. यावर्षी त्याला शेततळा मंजूर झाला. तो गावातच राहत होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र सी-६० पोलिसांनी त्याला ठार करून खोटी चकमक दाखविली. एवढेच नव्हे तर त्याला नक्षलवादी म्हणून सुध्दा घोषीत केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची नि:पक्ष चौकशी करून सी-६० पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोनसूच्या पत्नींनी केली आहे. शुक्रवारी सोनसूच्या दोन्ही पत्नी व गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी गावकऱ्यांसह महेश कोपुलवार व अमोल मारकवार हजर होते.सोनसू विरोधात तीन गुन्हेसोनसू उसेंडीच्या विरोधात तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या विरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुध्दा केली होती. पोलीस व नक्षल यांच्यात चकमक झाली. त्यावेळी सोनसू उसेंडी हा नक्षल दलमच्या बाजुने होता. त्यामुळे चकमकीतच तो ठार झाला आहे, अशी माहिती पोलीस विभागाच्या जनंसपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
‘त्या’ चकमकीत ठार युवक नक्षलवादी नव्हता?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:23 IST
जंगलामध्ये पक्ष्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या एटापल्ली तालुक्यातील रेकनार येथील सोनसू मिरचा उसेंडी याला सी-६० पोलिसांनी खोट्या चकमकीत ठार करून त्याला नक्षलवादी घोषित....
‘त्या’ चकमकीत ठार युवक नक्षलवादी नव्हता?
ठळक मुद्देगावकऱ्यांचा आक्षेप : शिकारीसाठी गेलेला सोनसू उसेंडी पोलिसांचा बळी ठरल्याचा आरोप