लाखो रूपयांचा खर्च : स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान अलाउद्दीन लालानी धानोरा धानोरा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानाचे काम सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या वतीने वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले. या उद्यानातील कामांवर आतापर्यंत लाखो रूपयांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र या उद्यानातील रोपटे कोमेजली असून येथे अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. वर्षभरापासून या उद्यानाचे काम अपूर्ण आहे. परिणामी या उद्यानाच्या कामात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप धानोरावासीयांकडून होत आहे. ज्या गावाकडे गावालगत किमान एक एकर (४० आर) सलग क्षेत्र उपलब्ध असेल अशा गावांमध्ये उद्यानाची सदर योजना राबविण्यात येते. ज्या गावामध्ये गावालगत शासकीय पडिक जमीन उपलब्ध आहे, अशा जमिनीचे सौंदर्यीकरण करून विकास करणे हे या योजनेत अभिप्रेत आहे. जैवविविधता उद्यानात वृक्ष लागवड करणे, उद्यान निर्मिती, लहान मुलांना मनोरंजनासाठी व ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी तसेच विश्रांती घेण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षीत आहे. नक्षत्रवन, औषधी वनस्पती लागवड, स्थानिक जैवविविधता संवर्धन करणे, खेळणी बसविणे, कारंजे निर्मिती आदी कामे या उद्यानात प्रस्तावित करण्यात आली होती. मात्र शासनाकडून निधी प्राप्त होऊनही धानोराच्या सदर उद्यानात अंदाजपत्रकानुसार कामे होताना दिसून येत नाही. सामाजिक वनिकरण विभाग गडचिरोलीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याने या जैवविविधता उद्यानाचे तीनतेरा वाजल्याचे दिसून येत आहे. जैवविविधता उद्यानात झुले पाळणा, घसरपट्टी यावर सहा ते सात लाख रूपये खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. सदर खर्च बाजारभावाप्रमाणे तीन लाख रूपये आहे. झुले लावल्यानंतर चौथ्या दिवशी येथील एक झुला तुटून पडला. त्यामुळे या उद्यानात खेळणाऱ्या काही मुलांना किरकोळ जखमा झाल्याची माहिती आहे. या ठिकाणी सौरदिवे अद्यापही लावण्यात आले नाही. मार्च २०१६ मध्ये खर्च झाल्याचा कागदोपत्री रेकॉर्ड तयार करण्यात आला आहे. सदर कामाची ई-निविदा काढण्यात आली नाही. या उद्यानाला मुख्य प्रवेशद्वार आहे. मात्र याला अद्यापही दरवाजे लावण्यात आले नाही. वर्षभरापूर्वीच प्रवेशद्वारासह सर्व बाबींच्या खर्चाचे बिल काढण्यात आले. सदर उद्यानात १० ते १२ ब्रास मुरूम टाकून तो रस्त्यावर पसरविण्यात आला. मात्र या मुरूमाची रॉयल्टी काढण्यात आली नसून ई-टेंडरींग करण्यात आली नाही. उद्यान निर्मितीपूर्वी येथे जंकासचे बिट आगार होते. त्यावेळी येथे रस्ते तयार करण्यात आले होते. मात्र आता याच रस्त्यावर थातूरमातूर मुरूम टाकून लाखो रूपयांचे बिल काढण्यात आले आहे. उद्यानात झाडे लावण्यासाठी मजूर लावण्यात आले. मात्र या मजुराची डिसेंबर २०१६ च्या मजुरीची रक्कम अदा करण्यात आली नाही.
धानोरातील उद्यानाचे काम वर्षभरापासून अपूर्ण
By admin | Updated: March 5, 2017 01:26 IST