शोभा फडणवीस यांचे प्रतिपादन : भाजपतर्फे युवती, महिला नोंदणी व रक्षाबंधन मेळावागडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वन व खनिज संपत्ती आहे. वनौषधी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र उद्योग नसल्यामुळे महिला बेरोजगार आहेत. आता भाजप प्रणीत केंद्र व राज्य शासनाने महिलांचे प्रश्न व महिलांच्या विकासाबाबत कठोर पाऊले उचलली आहेत. आता प्रत्येक महिलेने उद्योगी बनण्याची गरज आहे. रोजगार निर्मितीतूनच महिलांचे खऱ्या अर्थाने सबलीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्या आ. शोभा फडणवीस यांनी केले.भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने गुरूवारी शिव-पार्वती मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित सुशिक्षित बेरोजगार युवती व महिला नोंदणी , मार्गदर्शन मेळावा व रक्षाबंधन सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, भाजपाचे गडचिरोली शहराध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, जिल्हा उपाध्यक्ष गजानन येनगंधलवार, प्रमोद पिपरे, रमेश भुरसे, प्रकाश अर्जुनवार, श्रीकृष्ण कावनपुरे, सुरेश मांडवगडे, डेडूजी राऊत, बी. एम. राजनहिरे, रेखा डोळस, लक्ष्मी कलंत्री, नगरसेविका बेबी चिचघरे, प्रतिभा चौधरी आदी उपस्थित होते. पुढे बोलताना फडणवीस म्हणाल्या, केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांचे स्वावलंबन व सबलीकरणाचे धोरण आखले आहे. या धोरणाचाच एक भाग म्हणून प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेंतर्गत हजारो महिलांचा सुरक्षा विमा काढल्या जात आहे. महिला व युवतींवरील अन्याय, अत्याचार कमी करण्यासाठी शासनाने ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ योजना कार्यान्वित केली आहे. महिलांना शासकीय नोकरीमध्ये ३० टक्के आरक्षण देण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखले आहे. ५० टक्के महिला जेव्हा शिक्षण, आरोग्य, उद्योग व विकासाच्या मुख्य प्रवाहात येतील, तेव्हाच महिला पूर्णपणे सक्षम होतील, असेही फडणवीस यावेळी म्हणाल्या.खा. अशोक नेते यांनी गडचिरोली जिल्ह्यातील युवती व महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण सातत्याने प्रयत्न करू, असे सांगितले. रक्षाबंधन कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना सुरक्षा विम्याची भेट देण्याचा कार्यक्रमही हाती घेतला आहे. स्वयंरोजगार करू इच्छीणाऱ्या महिनांनी माझ्या जनसंपर्क कार्यालयात संपर्क साधावा, असेही आवाहन खा. नेते यांनी यावेळी केले. याप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सुधाकर येनगंधलवार, संचालन रेखा डोळस यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी) चार हजार महिलांचा विमाभाजपच्या वतीने गुरूवारी आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा योजनेंतर्गत एकूण चार हजार महिलांचा विमा काढण्यात आला. या सर्व महिलांचे आवश्यक ते कागदपत्र घेऊन विमा पॉलिसीचे अर्ज भरून घेण्यात आले. भाजपच्या सदर कार्यक्रमाला जवळपास चार हजाराहून अधिक युवती व महिलांनी हजेरी लावली. यापैकी तीन हजार युवती व महिलांनी स्वयंरोजगारासाठी अर्ज सादर करून नोंदणी केली. नोंदणी केलेल्या सर्व युवती व महिलांना ‘मेक इन गडचिरोली’च्या संकल्पनेतून रोजगार देण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.
रोजगारातून महिलांचे स्वावलंबन व सबलीकरण शक्य
By admin | Updated: September 11, 2015 01:40 IST