दोन वर्ष उलटले : उपविभागीय वनाधिकाऱ्यांवर कारवाई नाही लोकमत न्यूज नेटवर्क आलापल्ली : आलापल्लीचे उपविभागीय वनाधिकारी रवी अग्रवाल यांच्या विरोधात अहेरी व आलापल्ली वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या महिला वन कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली होती. विशाखा समितीच्या अहवालात अग्रवाल हे दोषी असल्याचे नमूद करण्यात आले. मात्र अद्यापही अग्रवाल यांच्यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे वन विभागातील पीडित महिला कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. रवी अग्रवाल हे अहेरी व आलापल्ली वनपरिक्षेत्रात कार्यरत असताना त्यांचेकडून महिला वनकर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक मिळते, अधिकारी पदाचा धाक दाखवून महिला कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देणे, असे गंभीर आरोप करीत महिला कर्मचाऱ्यांनी तत्कालीन उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांच्याकडे ९ जून २०१५ रोजी लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन उपवनसंरक्षक हेमंतकुमार मीना यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विभागीयस्तरावर सुनीता तोडसाम यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समिती गठित केली. विशाखा समितीने अग्रवाल यांच्या कारभाराची चौकशी केली. संबंधित वनकर्मचाऱ्यांचे बयान नोंदवून घेण्यात आले. अग्रवाल यांना दोषी ठरवत तसा अहवाल विशाखा समितीने उपवनसंरक्षक मीना यांच्याकडे दिला होता. मात्र अद्यापही अग्रवाल यांच्यावर कारवाई झाली नाही. अग्रवाल यांच्या विरोधात जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, सामाजिक कार्यकर्ते विजय खरवडे यांनी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. वन विभागाकडून वनाधिकारी रवी अग्रवाल यांना अभय मिळत असल्याने त्यांची पुन्हा हिंमत वाढत आहे. अग्रवाल हे महिला व पुरूष वनकर्मचाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत, असे कंकडालवार व खरवडे यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तक्रारीची दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
महिला वन कर्मचारी न्यायापासून वंचित
By admin | Updated: May 12, 2017 02:36 IST