गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना एकत्र येऊन भाजपमुक्त जिल्हा परिषद करण्याचा आराखडा तयार करण्यात येत असला तरी गडचिरोली जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्याशिवायही भाजपला सत्तेची १०० टक्के संधी आहे. त्यामुळे जिल्ह्यातून भाजपमुक्त जिल्हा परिषद होणार नाही, असे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत ५१ पैकी २० जागा भाजप, १५ जागांवर काँगे्रस, ७ जागांवर आदिवासी विद्यार्थी संघ, ५ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, २ जागांवर राष्ट्रीय समाज पक्ष व २ जागांवर ग्रामसभांचे उमेदवार निवडून आले. निवडणुकीनंतर लगेचच भाजप, राष्ट्रवादी व रासपच्या एका उमेदवाराने एकत्र येऊन सत्ता स्थापनेबाबत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान भाजपला सत्तेबाहेर ठेवण्याच्या दृष्टीने दोन्ही काँग्रेस एकत्र येण्याबाबत राज्यस्तरावर हालचाली सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपपासून जिल्ह्यात दूर झाला तर आदिवासी विद्यार्थी संघ भाजपला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. भाजपासाठी आविसचा पाठिंबा स्थिरतेच्या दृष्टीने अतिशय दिलासा देणारा राहू शकतो. भाजप व आविसं दोघे मिळूनच २७ सदस्य होतात. त्यामुळे त्यांना इतरांच्या कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र गडचिरोलीत राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री व राकाँचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडे निर्णयाची पूर्ण जबाबदारी आहे. राज्यपातळीवर काहीही हालचाली झाल्या असल्या तरी जिल्ह्याच्या हिताच्या दृष्टीने व २०१९ चे राजकारण लक्षात घेऊन धर्मरावबाबा आत्राम आपली पहिली पसंती भाजपलाच देतील,असे राजकीय जाणकार मानतात. धर्मरावबाबा आत्राम यांच्या दृष्टीने धर्मनिरपेक्ष हा दृष्टिकोन व्यापक अर्थाने आहे. त्यामागे भाजपची राज्यात असलेली सध्याची सत्ता व गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला असलेला वाव या गोष्टीही कारणीभूत आहे. व धर्मरावबाबा व अम्ब्रीशराव आत्राम या दोघांना आदिवासी विद्यार्थी संघ अहेरी विधानसभा क्षेत्रात वाढू द्यायचा नाही, त्यामुळे ते भाजपलाच राष्ट्रवादीचा पाठिंबा देण्याचा निर्णय घेतली, असा विश्वास राष्ट्रवादीचे अनेक नेते व्यक्त करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
राष्ट्रवादीच्या पाठिंब्याविनाही भाजपालाच संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:07 IST