आरमोरी : राज्याचे माजी गृहमंत्री तथा जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री स्व. आर. आर. पाटील यांच्या निधनाने तळागळातील लोकांच्या समस्या जाणणारा, संवेदनशील व विकासाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना आरमोरी येथील श्रद्धांजली कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली.येथील किसनराव खोब्रागडे महाविद्यालयात शुक्रवारी आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. हरिराम वरखडे होते. यावेळी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, माजी मा. डॉ. रामकृष्ण मडावी, राकाँचे प्रदेश सदस्य संदीप ठाकूर, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमिन लालानी, गणपत वडपल्लीवार, महेंद्र रामटेके, जोगीसाखराचे उपसरपंच सोनबावणे, शैलेंद्र रामटेके, प्रा. एन. जे. बन्सोड, प्रा. म्हस्के, प्रा. बोकडे, प्रा. वनमाळी उपस्थित होते. सर्वपक्षीय मान्यवरांच्या हस्ते आर. आर. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पचक्र वाहण्यात आले. त्यानंतर मेनबत्ती प्रज्वलीत करून आदरांजली वाहण्यात आली. आर. आर. पाटील हे निगर्वी नेते होते. सर्वसामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती, असे भावोद्गार हरिराम वरखडे यांनी काढले. आर. आर. पाटील हे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व होते. उत्कृष्ट संसदपटू, सच्चा माणूस म्हणून त्यांची गणना होत होती, त्यांच्यासारखा हजरजबाबी, सर्वसामान्यांच्या समस्यांची कळकळ असलेला लोकनेता हरपल्याने महाराष्ट्रासह संपूर्ण समाजाची हानी झाली आहे, असे उद्गार भाग्यवान खोब्रागडे यांनी काढले. कार्यक्रमाच्या शेवटी दोन मिनीट मौनधारण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अमरदीप मेश्राम, संचालन प्रा. मनीष राऊत यांनी केले. श्रद्धांजली कार्यक्रमाला आरमोरी येथील सर्व पक्षाचे कार्यकर्ते प्राध्यापक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गडचिरोली येथे प्रेसक्लबच्या वतीने आर. आर. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनिल धामोडे, अरविंद खोब्रागडे, मारोती मेश्राम, जयंत निमगडे, विलास दशमुखे, सुरेश पद्मशाली, रोहिदास राऊत, सुरेश सरोदे, सुरेश नगराळे, शेमदेव चापले, हेमंत डोर्लीकर, नंदकिशोर काथवटे उपस्थित होते. यावेळी मौन पाळून आबांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)
आबांच्या जाण्याने विकासाभिमुख नेतृत्व हरपले
By admin | Updated: February 23, 2015 01:26 IST