संवर्ग विकास अधिकाऱ्यांना निवेदन : चार वर्गांसाठी एकच शिक्षकआरमोरी : येथून दोन किमी अंतरावर असलेल्या काळागोटा येथील जिल्हा परिषद शाळेत चार वर्गांसाठी एकच शिक्षक देण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून २४ तासाच्या आत शाळेला शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा पालक व नागरिकांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना शुक्रवारी दिलेल्या निवेदनातून दिला आहे. काळागोटा येथे १ ते ४ पर्यंत वर्ग असून सुमारे ५२ विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत. दररोज विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहते. शासनाच्या नियमानुसार चार वर्गांसाठी दोन शिक्षक असणे आवश्यक आहे. मात्र काळागोटा येथील शाळा सुरू झाल्यापासून एकच शिक्षक कार्यरत आहे. त्यांच्याकडेही मुख्याध्यापकांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याबरोबरच मुख्याध्यापकाची जबाबदारीसुद्धा सांभाळावी लागत आहे. कार्यालयीन कामे व विविध प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर शाळेमध्ये कुणीच उपस्थित राहत नाही. विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता, या ठिकाणी आणखी एक शिक्षक देण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी अनेक वेळा शिक्षण विभागाकडे केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष झाले. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी बीडीओंना दिलेल्या निवेदनातून शिक्षकाची नेमणूक करा, अन्यथा कुलूप ठोकण्याचा इशारा दिला आहे.निवेदन देतेवेळी अस्मिता बारसागडे, हरेश धकाते, महेंद्र मेश्राम, नेमिचंद लांजेवार, प्रमोद पेंदाम, विलास कोडाप, मुकेश वासेकर, विनोद तुंगडीवार, राजू पठाण, राजू वाघधरे, नरेश टेकाम, अरूण नवारे, पुरूषोत्तम मुंगीकोल्हे, दिवाकर पेंदाम, राजू मेश्राम, रमेश धकाते, साईनाथ धोडरे, पौर्णिमा धकाते, भूमिका वासेकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
काळागोटा शाळेला कुलूप ठोकणार
By admin | Updated: September 19, 2015 02:04 IST