शुक्रवारी चामोर्शीत पोहोचणार : शेकडो नागरिकांची उपस्थितीअहेरी/आष्टी : सूरजागड ते गडचिरोली दरम्यान काढण्यात आलेल्या पदयात्रेचे अहेरी तालुक्यातील खमनचेरू व चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे स्वागत करण्यात आले. अहेरी येथून सदर पदयात्रा बुधवारी खमनचेरू येथे पोहोचली. खमनचेरू येथे यावेळी अहेरी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष उषा आत्राम यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्यांनी यात्रेचे जोरदार स्वागत केले. यावेळी यात्रेचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी यात्रेच्या आयोजनामागची भूमिका विषद केली. यावेळी यात्रेकरूच्या रात्रीच्या जेवणाची व गुरूवारी सकाळच्या नाश्ताची व्यवस्था उषा आत्राम यांनी केली होती. त्यानंतर पदयात्रा आष्टीकडे रवाना झाली. आष्टी येथे गुरूवारी ग्रामपंचायततर्फे पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच वर्षा देशमुख, उपसरपंच नंदा डोर्लीकर, आष्टीचे पोलीस पाटील विनोद खांडरे, आष्टीचे ग्रा. पं. सदस्य रवी नागुलवार, सत्यशील डोर्लीकर, माया ठाकूर, ममता कुकडकर, ज्योत्सना मेश्राम, देठे, पत्रकार गणेश शिंगाडे, माजी जि. प. सदस्य दिवाकर कुंदोजवार, व्यंकटेश बुर्ले, संतोष सोयाम, शंकर मारशेट्टीवार, अनिल आल्लुरवार, माजी पं. स. सदस्य मिनाक्षी देवगडे, माजी सरपंच सिंधू दुर्गे, छोटू दुर्गे, रत्नाकर गोटमुलकवार, तुकाराम तोरे आदी उपस्थित होते.आंबेडकर चौकातून शिवाजी चौकात व तेथून हनुमान मंदिर व आंबेडकर चौक येथे ग्रामस्थ या पदयात्रेत सहभागी झाले होते. स्वतंत्र विदर्भ राज्यासह अहेरी जिल्हा व आष्टी तालुका झाला पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. त्यानंतर यात्रा चामोर्शीकडे प्रवासाकडे निघाली.गुरूवारी रात्री उशिरापर्यंत ही यात्रा चामोर्शी येथे पोहोचणार असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करून १९ डिसेंबर रोजी यात्रा गडचिरोलीत दाखल होईल. त्यानंतर खा. अशोक नेते यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून इंदिरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर पदयात्रेकरू धडकणार आहेत.
खमनचेरू, आष्टीत पदयात्रेचे स्वागत
By admin | Updated: December 18, 2015 01:49 IST