महिलेचा जागीच मृत्यू : कुरखेडा येथे वाहनचालकाला अटकदेसाईगंज : स्थानिक मातावॉर्डातील लग्न कार्यासाठी आलेल्या वाहनाने, मागे वळत असताना ६८ वर्षीय वृध्द महिलेस चिरडले. डोक्याला जबर मार लागल्याने त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. धडक लागताच वाहनचालक फरार झाला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवीत त्याला कुरखेडा येथे अटक केली. सदर घटना शुक्रवारी दुपारी ३ वाजता घडली. नगरपालिका सभागृहात आयोजित लग्न समारंभासाठी कुरखेडा येथून नवरदेवाकरिता सदर वाहन आले होते.स्थानिक नगर पालिका सभागृहात सकाळी ११ वाजता माधुरी ढवळे यांच्या मुलीचा लग्नसमारंभ आयोजित होता. कुरखेडा येथील नवरदेवाकरिता गाडी एमएच ४० एसी ५१२१ ही शहरात आली होती. लग्न दुपारी २ वाजता लागले. दारूची मौज भागविण्याकरिता वाहन चालक हेमंत घोगरे व नवरदेवाकडील मित्रमंडळी सोबत लगतच्या आंबेडकर वार्डात वाहनासह गेले होते. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान नगर परिषद शाळेसमोर वाहन मागे घेत असताना वाहन चालकाला वाहनामागे असलेली वृध्द महिला रूक्माबाई रामा गराडे (६८) रा. मातावार्ड देसाईगंज ही दिसली नाही व त्याने तिला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोराची होती की, त्यात महिलेच्या डोक्याला जबर मार लागून ती जागीच गतप्राण झाली. वॉर्डातील नागरिक तत्काळ गोळा झाले. भीतीने वाहनचालक हेमंत घोगरे (२७) रा. कुरखेडा हा कुरखेड्याकडे पळून गेला. सदर वाहन सजविलेले असल्याने ते लग्नाचे असल्याची माहिती नागरिकांना मिळाली. त्यानुसार पोलिसांना माहिती देण्यात आली. हेमंतला कुरखेडा येथून ताब्यात घेतले. वाहनचालकावर भादंविीया कलम २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास देसाईगंज पोलिस करीत आहेत. (वार्ताहर)
लग्न वाहनाने वृध्देस चिरडले
By admin | Updated: May 30, 2015 01:57 IST