लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात दाखल झाली असून दैनंदिन कोरोना रुग्णांनी आता शतकही गाठले आहे. असे असताना नागरिक मात्र कोरोनाचे नियम पाळण्यात अजूनही बिनधास्तपणे दाखवत आहेत. संक्रांतीनिमित्त विविध वस्तूंच्या खरेदीसाठी मार्केटमध्ये महिला ग्राहकांची संख्या वाढली आहे. पण समुहाने येणाऱ्या महिला बहुतांश वेळा मास्कचा वापरच करत नसल्याचे दिसून येते. अनेकींच्या नाकावरील मास्क खाली घसरलेला असतो. काहींचा मास्क तर नाक आणि तोंडही न झाकता केवळ हनुवटी झाकत असल्याचे दिसून आले.ग्राहकांची गर्दी पाहता दुकानदारांनाही त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही.
मास्क ना दुकानदारांना- गडचिरोलीच्या मार्केट लाईनमध्ये बहुतांश मोठ्या दुकानांमध्ये दुकानदार मास्कचा वापर करतात. पण काहींचा मास्क खाली सरकलेले असतात. दमकोंडी होत असल्याने सतत नाकावर मास्क ठेवत नसल्याचे एकाने सांगितले.- काही छोटे व्यावसायिक मात्र बिनधास्त राहतात. त्यांना कोणत्याची निर्बंधांची फिकीर नसते. तिथे येणारे ग्राहकही मग दुकानदाराचे अनुकरण करतात.
ना ग्राहकांना- दुकानांमध्येच नाही तर मार्केट लाईनमध्ये फेरफटका मारला तरी अर्ध्यापेक्षा जास्त लोक मास्कविना दिसतात. तरीही त्यांच्यावर नगर परिषद किंवा इतर कोणत्याही यंत्रणेकडून दंडात्मक कारवाई होत नाही. त्यामुळे लोकांचा बिनधास्तपणा कायम आहे.
ग्राहक ऐकतच नाहीत
ग्राहकांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करावा. आम्ही ग्राहकांना विनंती करतो. आमच्या समाधानासाठी ते जवळचा मास्क नाकातोंडावरही घेतात. पण त्यांनी नेहमीसाठीच हे लक्षात ठेवले पाहिजे.- मनोज देवकुले, दुकानदार
दुकानात येणाऱ्यांना मास्कसाठी सांगताे. पण लोक ऐकत नाही. त्यांना जास्त आग्रह केला तर नाराज होतात. कोणीही ग्राहक नाराज होणे दुकानदाराला आवडणार नाही. ग्राहकांनीच स्वत:हून मास्क घालावा.- भारती भोयर, दुकानदार