गडचिरोली : युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कीर्तीकुमार ऊर्फ बंटी भांगडिीाा यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले गडचिरोली येथील सर्वच पदाधिकारी विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम करणार नाही, त्यांनी शिवसेना उमेदवाराला समर्थन देण्याबाबत निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपसमोर समस्या उभी राहण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मोठी आघाडी मिळाली होती. त्यावेळी युवाशक्ती आघाडी भाजपसोबत होती. विधानसभा निवडणुकीच्या एक महिनापूर्वी युवाशक्ती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष कीर्तीकुमार भांगडीया यांनी भाजपात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत गडचिरोली नगरपालिकेतील सर्व पदाधिकारीही भाजपात दाखल झाले. याचदरम्यान जिल्ह्यात युवाशक्ती संघटनेत फूट पडली. मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात नव्यानेच दाखल झालेल्या युवाशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय सोमवारी सकाळी घेतला आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या उमेदवारासोबत शिवबंधन बांधण्याचा नवा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती गडचिरोली नगर पालिकेतील गटनेते प्रा. राजेश कात्रटवार यांनी लोकमतशी बोलतांना दिली.आज प्रा. कात्रटवार यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली नगरपालिकेतील युवाशक्तीच्या बॅनरवर निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीला बांधकाम सभापती आनंद श्रृंगारपवार, न. प. उपाध्यक्ष रमेश चौधरी, माजी नगराध्यक्ष भूपेश कुळमेथे आदी उपस्थित होते. या बैठकीत कुळमेथे यांनी भरलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेना उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला, असेही कात्रटवार यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्रा. राजेश कात्रटवार यांच्यासह युवाशक्ती संघटनेकडून २०११ मध्ये गडचिरोली नगर परिषदेवर निवडून आलेले बहुसंख्य पदाधिकारी हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच होते. त्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला असावा, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
भांगडिया समर्थक शिवसेनेच्या वाटेवर
By admin | Updated: September 29, 2014 23:05 IST