महावितरणचे दुर्लक्ष : गडचिरोली शहरात अनेक ठिकाणी धोकादायक स्थितीगडचिरोली : गडचिरोली नगर पालिका क्षेत्रातील अनेक मार्गावर वाकलेले व जुने वीज खांब आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे सदर वीज खांब केव्हाही कोसळून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात महावितरणकडे नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. मात्र महावितरणने सदर ठिकाणी वीज खांब बदलविले नाही. गडचिरोली शहरापासून चामोर्शी मार्गावर तीन किमी अंतरावर असलेल्या सेमाना देवस्थान परिसरात मंदिरालगत असलेला वीज खांब पूर्णत: वाकलेला आहे. या ठिकाणी शनिवारसह इतर दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथील खांब केव्हाही कोसळून भाविकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गडचिरोली शहराच्या कॅम्प एरियामधील संतोषवार यांच्या घरालगतचा वीज खांबही पूर्णत: वाकलेल्या स्थितीत आहे. सदर खांब कोसळण्याच्या मार्गावर आहे. अशाच प्रकारे गडचिरोली शहरात विविध मार्गावर अनेक वीज खांब वाकलेले असून ते कोसळण्याच्या मार्गावर आहे. पावसाळ्यात आलेल्या वादळामुळे गडचिरोली शहरातील अनेक वीज खांब वाकलेले आहेत. ते तत्काळ बदलविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
वाकलेले वीज खांब कोसळण्याच्या मार्गावर
By admin | Updated: September 19, 2016 01:50 IST