पुल्लीगुडम येथील वास्तव : विहिरीत उतरून काढावे लागते पाणीसिरोंचा : तालुकास्थळापासून ५० किमी अंतरावर असलेल्या झिंगानूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या पुल्लीगुडम येथे मार्च महिन्यापासून भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. येथील महिलांना जुन्या विहिरीच्या तळाशी उतरून ग्लासाने पाणी काढावे लागत आहे. गुंडभर पाण्यासाठी या महिला स्वत:चा जीव दावणीला लावत असल्याचे भयावह वास्तव या गावामध्ये दिसून येते. घनदाट जंगलाने व्यापलेल्या पुल्लीगुडम गावात जवळपास ५०० लोकसंख्या वास्तव्याने आहे. या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. हातपंप बिघडले आहेत. तर चांगल्या स्थितीत असलेल्या विहिरींचा गाळ उपसण्यात आला नाही. त्यामुळे या विहिरींना सुध्दा पाणी राहत नाही. जवळपास पाण्याचे कोणतेच साधन या गावाला उपलब्ध नाही. त्यामुळे मिळेल त्या साधनाचा वापर करून पाणी आणावे लागत आहे. गावातच १०० वर्षांपूर्वी बांधलेली विहीर आहे. मात्र या विहिरीची डागडुजी करण्यात आली नाही. विटांनी बांधलेली ही विहीर पूर्णपणे कोसळली आहे. एका बाजुने उतार जागा असल्याने गावातील महिला या विहिरीच्या तळापर्यंत जाऊन पाण्याचे गुंड भरतात. विशेष म्हणजे तळालाही बालटी भरेल एवढे पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे ग्लास किंवा लहान भांड्याच्या सहाय्याने पाणी काढावे लागते. पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पाणी काढताना ते गढुळ होते. तरीही ते पाणी पिल्याशिवाय पर्याय राहत नाही. पावसाळ्यामध्ये विहिरीतील पाणी काढण्यासाठी विहिरीवर दोन मोठमोठे लाकडे ठेवण्यात आली आहेत. सदर लाकडेही कोसळण्याचा धोका आहे. पाण्यासाठी जीव दावणीला लावून महिला पाणी भरत आहेत. पहाटेपासूनच या विहिरीवर महिलांची गर्दी जमायला सुरूवात होते. रात्रभर साचलेले पाणी सकाळी ६ वाजेपर्यंत संपते. झिंगानूर परिसरातील गावांमध्ये दरवर्षीच पाणी संकट निर्माण होते. या गावांमधील काही नागरिक उन्हाळ्याच्या दिवसात नाल्यांमध्ये खड्डा खोदून तात्पुरती पाण्याची व्यवस्था करतात. तर काही गावातील नागरिक जवळपासच्या नदीचे पाणी आणतात. झिंगानूर भागातील ही गंभीर समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पाठपुराव्याला सतत अपयशपुल्लीगुडम येथील हातपंप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. सदर हातपंप दुरूस्त करण्याबाबत तसेच गावातील विहिरींचा गाळ उपसण्याबाबत अनेकवेळा पाठपुरावा करण्यात आला. मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने गावातील महिलांना नाईलाजास्तव मोडकळीस आलेल्या विहिरीतून जीव धोक्यात घालून पाणी काढावे लागत आहे. गडचिरोली जिल्ह्यातील झिंगानूर परिसरात दरवर्षीच पाण्याचे संकट निर्माण होते. गावातील नागरिकांना बैलबंडीने पाणी आणावे लागते. या गावात बहुतांश नागरिकांकडे पाळीव जनावरे आहेत. त्यामुळे दरदिवशी हजारो लिटर पाणी लागते. या पाण्याची वाहतूक करताना नागरिकांचा बराचसा वेळ जातो. प्रशासनाने या गावामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना केल्यास गावकऱ्यांना पाणी संकटाच्या समस्येपासून दूर ठेवता येणे शक्य आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पाण्यासाठी जीव दावणीला
By admin | Updated: April 25, 2016 01:18 IST