नदी-नाले कोरडे : पाळीव व वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंतीभामरागड : भामरागड तालुक्यात पामुलगौतम, पर्लकोटा, इंद्रावती व बांडिया या प्रमुख चार नद्या आहेत. मात्र यंदाच्या खरीप हंगामात अत्यल्प पाऊस झाल्याने सदर नद्या कोरडया पडल्या असून नाले तसेच तलावही आटलेले आहेत. भामरागडची नळ पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भामरागड तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यामुळे पाळीव जनावरांसह वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. भामरागड तालुक्यात एकूण १२८ गावे आहेत. तालुक्यातील जलस्त्रोत यंदा आटल्यामुळे अनेक गावातील नागरिक हातपंपाचे पाणी पाळीव जनावरांना पाजत असल्याचे दिसून येत आहे. मात्र तालुक्यात पाळीव जनावरांची संख्या मोठी असल्याने हातपंपाचे पाणी जनावरांसाठी कमी पडत आहे. परिणामी पशुपालक उन्हाळ्यात प्रचंड त्रस्त झाले आहेत. सकाळच्या सुमारास जंगलात चरण्यासाठी गेलेल्या जनावरांनाही पाणी मिळणे कठीण झाले आहे. भामरागड तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच माजी मालगुजारी तलाव आहेत. मात्र सदर तलाव यंदा मार्च महिन्यातच कोरडे पडल्याने पाणीटंचाईचा भीषण प्रश्न नागरिकांसह जनावरांपुढे निर्माण झाला आहे. तालुक्यात अर्ध्यापेक्षा जास्त गावांमध्ये पाण्याअभावी पशुधन धोक्यात आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने गांभीर्याने विचार करून पाळीव जनावरे व वन्य प्राण्यांसाठी तसेच नागरिकांसाठी पाणीपुरवठ्याची सुविधा करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी) अनेक हातपंप नादुरूस्त; विहिरींची दुरवस्थाभामरागड तालुक्यात अनेक गावातील हातपंप बंद आहेत. तसेच काही हातपंप नादुरूस्त स्थितीत आहेत. सध्या सूर्य आग ओकत असल्याने वाढत्या उष्णतामानामुळे माणसाच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची गरज प्रचंड वाढत आहे. भामरागड तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वतीने अनेक ठिकाणी सार्वजनिक विहिरी आहेत. मात्र पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अनेक सार्वजनिक विहिरींची चार ते पाच वर्षात दुरूस्तीच झाली नाही. या विहिरींमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाण्याची पातळी प्रचंड खालावली आहे. एकूणच भामरागड तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट अधिकच तीव्र होत आहे.
भामरागड तालुक्यात पाणीटंचाई
By admin | Updated: April 6, 2016 01:35 IST