राजारामखांदला : अहेरी तालुका मुख्यालयापासून ४० किमी अंतरावर असलेल्या राजारामखांदला ते पत्तीगाव, कोत्तागुड्डम, चेरपल्ली या गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे मातीकाम प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत करण्यात आले. मात्र पाच वर्षांचा कालावधी उलटूनही या पोचमार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील नागरिकांना मार्गक्रमन करण्यासाठी यातना सहन कराव्या लागत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत राजारामखांदला ते चेरपल्ली या ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे मातीकाम करण्यात आले. मात्र त्यानंतर या मार्गावर खडीकरण व डांबरीकरण करण्यात आले नाही. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने या मार्गावरील पूल वाहून गेले. पुलाचा काही भाग पूर्णत: खचला. त्यामुळे या भागातील २०० च्या वर लोकवस्तीतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी रस्ताच उरला नाही. परिणामी पावसाळ्याच्या दिवसात या भागातील नागरिकांचा अहेरी तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला होता. रस्त्याच्या सुविधेअभावी पावसाळ्यात या भागातील विद्यार्थी व रूग्णांना काही वेळ बैलबंडीचा आधार घ्यावा लागला. रस्त्याच्या दूरवस्थामुळे वाहन मालक व चालक या मार्गाने वाहन टाकण्यास धजावत नाही. ६.५ किमी अंतराच्या पोचमार्गाचे खडीकरण व डांबरीकरण करून या भागातील नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्याकडे नागरिकांनी निवेदनाद्वारे केली होती. चर्चेदरम्यान पालकमंत्र्यांनी रस्ता दुरूस्तीचे आश्वासन दिले होते. मात्र रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरूवात झाली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांचे आश्वासन हवेत विरल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
दुर्गम भागात पक्क्या रस्त्यांची वानवा
By admin | Updated: March 18, 2015 01:39 IST