कुरूड: केंद्र सरकारने २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली. या योजनेतून प्रत्येक कुटुंबाला वर्षभरात १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. मात्र अनेकांना पुरेसे काम मिळाले नाही. त्यामुळे मजुरांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत देसाईगंज तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने काम बंद करण्यात आली. मात्र आता काेराेनाची लाट ओसरली असतानाही कामांना सुरुवात करण्यात आली नाही. येत्या काही दिवसात आता शेतीच्या कामांना सुरुवात हाेणार आहे. त्यामुळे काही दिवसानंतर जर कामे सुरू केली तर कामावर मजूरच जाणार नाही. काेराेनामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊनचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. राेहयाे मजुरीच्या माध्यमातून थाेडाफार आधार मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र ती आशासुद्धा मावळली आहे.
राेहयाेच्या नियमानुसार जाॅबकार्डधारक प्रत्येक कुटुंबाला वर्षभरातून किमान १०० दिवसांचा राेजगार द्यावा लागते. तेवढ्या दिवसांचा राेजगार न मिळाल्यास व कुटुंबाने कामाची मागणी केल्यास बेराेजगारी भत्ता द्यावा लागते. मात्र अनेक मजूर याबाबत अनभिज्ञ असल्याने बेराेजगारी भत्त्याची मागणी करीत नाही.