सिराेंचा: रोजगार हमी मजुरांना पुरेसा रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसेच पांदण रस्त्यांची कामे सुरू करण्याचे अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.
शेतीचा हंगाम संपल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार मिळणे बंद झाले आहे. बेरोजगारीमुळे त्रस्त झालेले मजूर दुसऱ्या जिल्ह्यात मजुरीसाठी जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करून रोहयोची कामे करण्याची सक्ती प्रशासनाला करावी. गडचिरोली जिल्ह्यात शेताकडे जाणारे अनेक जुने रस्ते आहेत. या रस्त्यांवर आता अतिक्रमण झाले आहे. सदर अतिक्रमण काढून कामे सुरू केल्यास ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल.
गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम रोजगार सेवकांचे मानधन व प्रवासभत्ता थकला आहे. ग्रामरोजगार सेवकांना पंचायत समितीस्तरावर गावातील कामे मंजूर करण्यास नेहमीच यावे लागते. परंतु मानधन व प्रवासभत्ता थकल्याने ते आर्थिक अडचणीत आहेत. त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे थकलेले मानधन व प्रवासभत्ता द्यावा, अशी मागणी हाेत आहे.