गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज- गडचिरोली या ५२.१६ किमीच्या रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाकडून ८० कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र शासनाकडून पहिल्या हप्त्यातील टोकन निधी म्हणून १० कोटी रूपये रेल्वो बोर्डाला मिळाले असून वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गावरील खासगी व शेतजमीन हस्तांतरणाची प्रक्रिया सप्टेंबर २०१५ पर्यंत पूर्ण होऊन आॅक्टोबरपासून वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होणार आहे, अशी माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे. नागपूर व बिलासपूर झोनल अधिकाऱ्यांची आढावा बैठक ब्रम्हपूरी येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत दक्षिण- पूर्व- मध्य रेल्वे नागपूरचे मुख्य अभियंता ए. के. पांडे यांनी जमीन हस्तांतरणाची कार्यवाही सुरू झाली आहे. सदर कार्यवाही पाच ते सहा महिन्यात पूर्ण झाल्यास आॅक्टोबरमध्ये रेल्वे मार्गाचे काम सुरू करणार असल्याचे सांगितले. राज्य शासनाकडून पहिल्या हप्त्यातील टोकन निधी म्हणून १० कोटी रूपयांचा निधी रेल्वे बोर्डास मिळाला आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. वडसा-गडचिरोली मुख्य रेल्वे लाईनमध्ये गडचिरोली रेल्वे स्थानकावर एक मुख्य व दोन उपलाईन, आरमोरी रेल्वे स्थानकावर एक मुख्य व एक उपलाईन राहणार असल्याचे पांडे यांनी सांगितले. ५२ किमी मार्गावर खासगी व शेतजमिनी अधिग्रहीत केल्या जाणार असल्याची माहिती आढावा बैठकीत देण्यात आली. यावेळी माजी आ. अतुल देशकर, उपमुख्य कार्यकारी अभियंता पात्रा, उपअभियंता प्रसाद, उपअभियंता गुप्ता, प्रा. दीपक उराडे, सतीश तलमले, नागभिड भाजप तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, प्रा. गणवीर, परेश शहादानी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
आॅक्टोबरमध्ये सुरू होणार वडसा- गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम
By admin | Updated: April 27, 2015 01:17 IST