शेतकऱ्यांसोबत चर्चा : शासनाकडून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न करणारदेसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी शुक्रवारी विधानसभा क्षेत्रातील दुष्काळग्रस्त गावांना भेट देऊन पिकांची परिस्थिती जाणून घेतली. त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. दुष्काळग्रस्त परिस्थिती शासनाच्या लक्षात आणून देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आ. गजबे यांनी शेतकऱ्यांना दिले.आरमोरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येत असलेल्या कुरखेडा तालुक्यात ६ हजार २०४ हेक्टरवर धानपिकाची रोवणी तर १ हजार ५२० हेक्टरवर आवत्या, आरमोरी तालुक्यात ३ हजार ३६२ हेक्टरवर रोवणी तर ३ हजार ३७० हेक्टरवर आवत्या, देसाईगंज तालुक्यात ८ हजार ३९६ हेक्टरवर रोवणी तर ४०७ हेक्टरवर आवत्या, कोरची तालुक्यात २ हजार १८७ हेक्टरवर रोवणी तर ५ हजार ६२१ हेक्टरवर आवत्या पद्धतीने धानपिकाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षीच्या हंगामात पाऊस कमी पडल्याने अजूनही काही ठिकाणी धानपिकाची रोवणी झाली नाही. ज्या शेतकऱ्यांनी रोवणी केली आहे, अशा शेतकऱ्यांचे धानपीक अडचणीत आले आहे. ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आ. क्रिष्णा गजबे यांनी देसाईगंज तालुक्यातील फरी, झरी, उसेगाव, शिवराजपूर, कुरूड, सावंगी, आरमोरी तालुक्यातील बोरी, वडधा, वैरागड, कुरखेडा तालुक्यातील कढोली, उराडी या गावातील शेतांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान काही भागांमध्ये विदारक परिस्थिती असल्याचे दिसून आले. कोरेगाव चोप परिसरात संपूर्ण पावसाळ्यात केवळ दोनवेळा पाऊस झाला. त्यामुळे या परिसरातील दहा टक्केही रोवणी पूर्ण झाली नाही. काही शेतकऱ्यांचे पऱ्हे करपण्याच्या मार्गावर आहेत. पऱ्हे करपल्याने रोवणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कढोली परिसरातही भयावह परिस्थिती दिसून आली. प्रत्यक्ष बांधावर जाऊन आमदारांनी शेताची पाहणी करण्याबरोबरच संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी काही शेतकऱ्यांनी मागील २० वर्षांत असा दुष्काळ उद्भवला नाही, असे अनुभव कथन केले. शेतकरीवर्ग धानाच्या पिकावर वर्षभराची गुजराण करतात. मात्र यावर्षी धानाचे पीक होणार नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शासन शेतकऱ्यांची पाठीशी उभे राहील, असेही आ. गजबे म्हणाले. (वार्ताहर)
आमदारांची दुष्काळग्रस्त भागाला भेट
By admin | Updated: August 24, 2015 01:29 IST