जनजागरण मेळाव्यात वितरण : नवी मुंबई, पालघर व नाशिक पोलिसांची मदतगडचिरोली : नवी मुंबई, पालघर व नाशिक पोलीस विभाग तसेच राज्यातील काही सेवाभावी संस्था यांनी गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरीब व होतकरू आदिवासी जनतेसाठी दिवाळीची भेट म्हणून दैनंदिन उपयोगी वस्तू, खेळाचे साहित्य, भांडी आदी साहित्य पाठविली आहेत. सदर साहित्य जनजागरण मेळावे व ग्रामभेटीदरम्यान वितरित केल्या जाणार आहेत. काही दिवसांपूर्वी राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला होता. या दौऱ्यादरम्यान येथील गरिबी त्यांच्या लक्षात आली. या नागरिकांना पोलीस विभागाने सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस महासंचालक दीक्षित यांनी केले होते. त्यांनी केलेल्या आवाहानाला पोलीस खात्यातून दाद मिळाली आहे. दिवाळी उत्सव हा सर्व समाजातील सर्व स्तरावर साजरा केला जातो. अशा आनंदाच्या सोहळ्यात गरीब आदिवासी नागरिकांना अर्धपोटी उपाशी राहावे लागते. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींसाठी पोलीस विभागाने भेट वस्तू पाठविल्या आहेत. सदर वस्तू जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रकने पाठविण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनी स्वत: जातीने उपस्थित राहून आलेले सामान उतरवून घेतले. त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व सामान मोजून घेतले. सदर साहित्य मुंबई, पालघर व नाशिक पोलीस दलाकडून पाठविण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या या नावीण्यपूर्ण उपक्रमामुळे आदिवासी व पोलीस यांच्यामधील ऋणानुबंध आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. (नगर प्रतिनिधी) उपलब्ध झालेल्या भेट वस्तूपोलीस विभागाकडून प्राप्त झालेल्या वस्तूंमध्ये १ हजार ५० नग ताट, १ हजार ५० नग ग्लास, २ हजार नग वाटी, १ हजार नग प्लेट, ३० पातेले, ३०० नग व्हॉलिबॉल नेट, ३०० नग व्हॉलिबॉल, २०० नग क्रिकेट बॅट व बॉल, ८०० नग शर्ट, पॅन्ट, १ हजार नग ट्रकपॅन्ड, १ हजार नग टी-शर्ट, १ हजार नग साड्या, २ हजार नग शर्ट व पॅन्ट, १०१ बॉक्स जुने कपडे, ५ गोण्या साखर या भेट वस्तू उपलब्ध झाल्या आहेत. या भेटवस्तूंचे जनजागरण मेळाव्यादरम्यान व ग्रामभेटीदरम्यान वितरण केले जाणार आहे, अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.
पोलिसांकडून आदिवासींसाठी दिवाळी भेट
By admin | Updated: November 7, 2015 01:14 IST