चामोर्शी : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांनी चामोर्शी येथील गटसाधन केंद्राला भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी करून विविध उपक्रमांबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम उपस्थित होते. भेटीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटसाधन केंद्रातील विविध सुविधा उपलब्ध असल्याची माहिती घेतली. त्याबरोबरच तंबाखू विरोधी मोहिमेची समाज व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करणे, शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, एक मूल, एक झाड या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करणे आदी उपक्रम राबविण्याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर गटसाधन केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा संपदा मेहता यांनी घेतला. गटसाधन केंद्रांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रम व कामकाजाची प्रशंसाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली व गटसाधन केंद्रातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. गटसाधन केंद्र चामोर्शीच्यावतीने गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता यांचे स्वागत केले. यावेळी केंद्रप्रमुखाच्या सभेत विधानसभा निवडणुकीत मताधिकार बजाविण्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती करणे, मतदान केंद्राच्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करणे आदींबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आले. कार्यक्रमाचे आभार विस्तार अधिकारी धर्मानंद मेश्राम यांनी मानले. सभेला तालुक्यातील शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची गटसाधन केंद्राला भेट
By admin | Updated: September 27, 2014 01:38 IST