पुरूषोत्तम भागडकर - देसाईगंजआधुनिक भगवतगीता मानल्या जाणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेचा प्रचार करण्याची अभिनव कला मोहटोला (किन्हाळा) येथील सदाशिव वाघमारे महाराज यांनी मागील १५ वर्षांपासून अवलंबिली असून ज्या गावातील एखाद्या नागरिकाचा मृत्यू होतो. त्याच गावी जाऊन तेथील विसावा स्वच्छ करण्याबरोबरच ग्रामगीतेचाही प्रचार करीत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता ४२ अध्यायांची आहे. या ग्रामगीतेत ग्रामीण भागाच्या विकासाचे मंत्र लपले आहे. त्यामुळेच ग्रामगीता ही शहरापेक्षा ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. ग्रामगीतेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांची व्यथा, दीनदुबळ्यांचे उद्धान, ग्राम आरोग्य, ग्रामसुधारणा, ग्राम स्वच्छता आदीवर मार्गदर्शन केले आहे. सदाशिव वाघमारे महाराज यांनी ग्रामगीतेचा प्रचार करण्यासाठी स्वत:ला वाहून घेतले आहेत. सध्य:स्थितीत ते ८७ वर्षाचे असून आजही ग्रामगीतेचा प्रचार करण्यासाठी धडपळत आहेत. मोहटोला परिसरातील गावांमधील कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्याचे कळताच ते त्या गावी पायदळ जाऊन गावाच्या बाहेर ज्या ठिकाणी मृतकाला विसावा देण्याचा जागा आहे, ती जागा व आजुबाजूचा परिसर स्वच्छ करून ठेवतात. या माध्यमातून ते परिसर स्वच्छतेचा मूलमंत्र गावातील नागरिकांना देतात.पहाटेला उठून गावातील हनुमान मंदिरात जाऊन ध्यानपाठ, प्रार्थना करतात. भल्यापहाटे घंटीचा गजर करून नागरिकांना उठवितात. हा त्यांचा नित्यक्रम मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. संसारी पुरूष असलेले सदाशिवराव उर्फ भदाबोवा यांनी राष्ट्रसंतांच्या सामूदायिक प्रार्थनेतून बोध घेतला. त्यांच्या या नित्याच्या उपक्रमामुळे मोहटोला परिसरातील १०० गावांमध्ये त्यांनी ग्रामगीतेचा प्रचार केला आहे. त्यांच्या या विशेष कार्यशैलीमुळे मोहटोला परिसरात वाघमारे महाराजांचे नाव प्रसिद्ध झाले आहे.
विसाव्याच्या स्वच्छतेसह शेकडो गावांमध्ये ग्रामगीतेचा प्रचार
By admin | Updated: December 1, 2014 22:54 IST