जयंती दिन विशेष : तळोधीत लोकवर्गणीतून बांधले मंदिर;दरवर्षी विविध धार्मिक कार्यक्रम गडचिरोली : स्वच्छतेचा संकल्प करण्याचा संदेश प्रत्येक नागरिकांना देणारे संत गाडगे महाराज यांचे विचार अंगिकारणारे गाव क्वचितच पाहावयास मिळते. परंतु चामोर्शी तालुक्यातील तळोधी (मो.) या गावातील नागरिक गेल्या १९ वर्षांपासून गाडगे महाराजांचे विचार आत्मसात करुन त्यांचे विचार समाजात पोहोचविण्याचे काम करीत आहेत. गावात मंदिर बांधून शातंता व सलोख्याचे वातावरण ठेवण्याचा प्रयत्न ते आजही करीत आहेत. गाडगे महाराजांच्या सामाजिक कार्यातून प्रेरीत होऊन चामोर्शी तालुक्यातील तळोधीवासीयांनी ६ जून १९९४ ला गाडगे महाराजांचे मंदिर गावात उभारले. मंदिर उभारण्यासाठी सेवा सहकारी संस्थेने जागा दान दिली. लोकवर्गणीतून हे मंदिर उभे झाले. गाडगे महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. नुसते मंदिर उभारूनच गावकरी थांबले नाहीत तर त्यांनी शासनाची परवानगी घेऊन १७ आॅगस्ट २००१ ला या मंदिरात बालवाडी सुरू केली. २००२ ते २००६ या कालावधीत गीता दुधबळे यांना अंगणवाडी सेविका म्हणून ५०० रुपये मानधनावर नेमण्यात आले. येथे २० बालके येत होती. सदर काम लोकवर्गणीतून गावकरी करीत होते. परंतु कालांतराने बालवाडीचा खर्च करणे शक्य झाले नाही. परंतु गावकऱ्यांची गाडगे महाराजांवरील श्रद्धा कमी झाली नाही. मंदिराची देखभाल व कार्यक्रम आयोजनासाठी गाडगे महाराज स्मारक समिती स्थापन करण्यात आली. ही समिती सध्या जबाबदारी सांभाळत आहे. (शहर प्रतिनिधी)
संत गाडगेबाबांचा आदर्श बाळगणारे गाव
By admin | Updated: February 23, 2017 01:37 IST