मुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील वन विभाग तपासणी नाक्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला मागील बाजूने दुचाकीस्वाराने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली. येथील वनोपज तपासणी नाक्याजवळ बल्लारपूर येथील निरभाई ट्रान्सपोर्टच्या मालकीचा एमएच-३४-एम-६५२० ट्रक पंक्चर झाल्यामुळे उभा होता. दरम्यान, वाहनचालक धनराज गोविंदा चौधरी वाहन दुरूस्त करण्याच्या हेतूने कामी लागले होते. वाहने ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला जागाही होती. परंतु मुरूमगावमार्गे एमएच- ३३ - के -८८११ या वाहनाने येणाऱ्या बाजीराव मटकु उईके (२५) रा. डब्बाघराची यांनी मागील बाजूने वाहनास धडक दिली. या धडकेत ते गंभीररीत्या जखमी झाले. धडक एवढी जबरदस्त होती की, दुचाकी वाहन पूर्णत: क्षतिग्रस्त झाले. गंभीर जखमी झालेल्या बाजीराव उईके यांना मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात भरती करण्यात आले. परंतु उईके यांच्या डोक्यावर व छातीवर गंभीर जखमी झाल्याने धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयात त्यांना उपचारार्थ भरती करण्यात आले. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास मुरूमगाव पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी महेश मांडवे करीत आहेत.
उभ्या ट्रकला दुचाकीची धडक
By admin | Updated: September 29, 2014 00:44 IST