जिमलगट्टा : अहेरी तालुक्यातील मरपल्लीवरून जिमलगट्टाकडे प्रवाशी घेऊन येणारे बोलेरो वाहन उलटल्याने बारा प्रवाशी जखमी झाल्याची घटना उमानूर गावाजवळील वळणावर आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात बोलेरो वाहनातील बारा प्रवाशी जखमी झाले. शंकर अंकलू दिकोंडा (४०) रा. मरपल्ली यांच्या मालकीचे एमएच ३३ जी १३८३ क्रमांकाचे बोलेरो वाहन प्रवाशी घेऊन मरपल्लीवरून जिमलगट्टाकडे जात होते. दरम्यान चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उमानूर गावाजवळील वळणावर सदर वाहन उलटले. या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये नारायण सदाशिव बोरकुटे (२२) रा. मरपल्ली, लक्ष्मीस्वामी अट्टेला (५०) रा. सुध्दागुड्डम, मांतय्या बाजीराव सडमेक (३५) रा. भुजंगरावपेठा, शोभा कृष्ण मडावी (३२) रा. जोगनगुड्डा, शंकर अंकलू दिकोंडा (३५) रा. जोगनगुड्डा, भाना दुर्गा कोरेत (५०) रा. येर्रागड्डा, मातय्या बापू कोंडागुर्ले (२८) रा. मरपल्ली, हरिष बापू कोंडागुर्ले (४४) रा. मरपल्ली, पुषा भिका दुर्गे (६०) रा. मरपल्ली, भास्कर गणपत सिडाम रा. येंकाबंडा व अमानूर शाळेच्या शिक्षिका रूपाली चंपतराव काळे (२८) आदींचा समावेश आहे. सर्व जखमींना उपचारासाठी जिमललगट्टा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गैरहजर होते. तसेच येथील रूग्णवाहिका नादुरूस्त असल्याने खासगी वाहनाच्या सहाय्याने सर्व जखमींना पुढील उपचारासाठी अहेरीच्या उपजिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेसंदर्भात जिमलगट्टा पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. (वार्ताहर)
वाहन उलटले
By admin | Updated: March 18, 2015 01:41 IST