राजन्नापल्लीजवळ अपघात : दोन गंभीर, सात किरकोळ जखमी सिरोंचा : गडचिरोलीवरून सिरोंचा तालुक्यातील सोमनूर व कालेश्वर येथे दर्शनासाठी जात असताना चारचाकी वाहनाला अपघात घडून वाहन उलटल्याने वाहनातील दोन बालके जागीच ठार झाले. दोन इसम गंभीर जखमी झाले असून सात जण किरकोळ जखमी झाले. सदर घटना शनिवारी सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास सिरोंचा-आसरअल्ली मार्गावर राजन्नापल्ली गावानजीकच्या वळणावर घडली. संस्कार धनवंत बोबाटे (६), कार्तिकी धनवंत बोबाटे (४) रा. हनुमान वार्ड, गडचिरोली अशी मृतक बहिण-भावांची नावे आहेत. गडचिरोली-नवेगाव येथील बोबाटे व मस्के कुटुंबिय सिरोंचा तालुक्यातील सोमनूर व कालेश्वर दर्शनासाठी शुक्रवारी निघाले. कालेश्वरला दर्शन झाल्यानंतर सदर दोन्ही कुटुंब चारचाकी वाहनाने सोमनूर संगमाकडे जाण्यासाठी निघाले. दरम्यान सिरोंचापासून चार किमी अंतरावर असलेल्या राजन्नापल्ली गावाजवळ वळणावर एमएच ३३ ए ४६३३ क्रमांकाचे चारचाकी वाहन खड्ड्यात उतरले. या वाहनाचा टायर फुटल्याने काही अंतरावर जाऊन हे वाहन उलटले. या अपघातात एकाच कुटुंबातील दोन चिमुकले बहिण-भाऊ जागीच ठार झाले. दोन गंभीर तर सात जण किरकोळ जखमी झाले. सदर वाहनात एकूण १२ जण बसले होते. वाहन चालक सखाराम नरोटे (२३) रा. बुऱ्हानटोला ता. धानोरा याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये पोर्णिमा धनवंत बोबाटे (३५), इशिका रमेश मस्के (१४) रा. गडचिरोली यांचा समावेश आहे. या दोघांवर सिरोंचाच्या ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करण्यात आला. त्यानंतर या दोघांना पुढील उपचारासाठी मंचेरियल येथे हलविण्याची आल्याची माहिती आहे. अपघातात रमेश मोतीराम मस्के (४२), विनोद मोतीराम मस्के (३२), शिल्पा विनोद मस्के (२५) सर्व रा. गडचिरोली यांचा समावेश आहे. या जखमींवर सिरोंचाच्या रूग्णालयात उपचार करण्यात आला. सिरोंचा पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून वाहनचालकावर भादंविचे कलम ३०४ (अ), २८९, ३३७, ३३८, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सिरोंचाचे पोलीस उपनिरिक्षक दाभाडे करीत आहेत.
वाहन उलटले, दोन बालके ठार
By admin | Updated: February 26, 2017 01:47 IST