गर्भपात प्रकरण : पोलिसांनी भंडारा येथून घेतले ताब्यातएटापल्ली : तालुक्यातील दोन वेगवेगळ्या अवैध गर्भपात प्रकरणातील आरोपी बडतर्फ वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा खापर्डे यांना एटापल्लीच्या पोलीस पथकाने शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी खापर्डे यांना भंडारा येथील त्यांच्या राहत्या घेऊन ताब्यात घेतले. गर्भपात प्रकरण उघडकीस आल्यावर तब्बल २० दिवसांनंतर खापर्डे यांना अटक करण्यात एटापल्ली पोलिसांना यश आले. एटापल्ली तालुक्यातील बिड्री येथील युवतीचा बळजबरीने गर्भपात व ऐकरा नाला परिसरात बेवारस स्थितीत अर्भक आढळल्या प्रकरणी डॉ. वर्षा खापर्डे यांचेवर १० मार्च रोजी एटापल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही प्रकरणातील पाच आरोपींना अटक करून सुरूवातीला पोलीस व त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. दरम्यान, गर्भपात प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा खापर्डे यांनी गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली नव्हती. २५ मार्च रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने डॉ. खापर्डे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला तेव्हापासून डॉ. वर्षा खापर्डे फरार होत्या. एटापल्लीचे पोलीस पथक त्यांच्या मागावर होते. ३ एप्रिल रोजी शुक्रवारला सकाळी ८ वाजता पोलीस पथकाने खापर्डे यांचे भंडारा येथील फुले कॉलनीतील घर गाठून त्यांना ताब्यात घेतले. सदर कारवाई एटापल्लीचे पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मदाने, योगेश परवते, अलोणे, स्मिता उराडे, पुष्पा कुळमेथे यांनी केली. पोलीस पथक एटापल्ली येथे रवाना झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)तीन आरोपींना १३ पर्यंत एमसीआरएटापल्ली तालुक्यातील बिड्री येथील गर्भपात प्रकरणातील कैलाश वेलादी, राजेश वेलादी व चैते वेलादी या तीन आरोपींना १३ एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वर्षा खापर्डे यांना अटक
By admin | Updated: April 4, 2015 00:47 IST