सिरोंचा : तेलंगणा राज्याच्या विविध गावातून तसेच सिरोंचा तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर विविध जातीचे आंबे बाजारात विक्रीसाठी आले आहे. त्यामुळे सिरोंचाचा आंबे बाजार सध्या विविध जातीच्या आंब्यांनी हाऊसफुल झाला आहे. सिरोंचा बसस्थानकाच्यासमोर महाकाय वृक्षाच्या खाली आंबे बाजार सकाळपासूनच भरतो. येथे आंध्र प्रदेशासह सिरोंचा तालुक्यातील विविध गावातील महिला व पुरूष तसेच काही शेतकरी आपले आंबे वाहनाने आणतात. या आंब्यांची मोठी साथ येथे सध्या भरत आहे.सिरोंचा तालुक्याची ओळख असलेला कलेक्टर आंबा हा या बाजाराचा आकर्षण आहे. याशिवाय विविध जातीचे गावठी व अन्य आंबेही बाजारात विक्रीला आहे. निलमसारख आंबा केवळ ४० ते ५० रूपये किलो दराने या बाजारात विक्रीसाठी आहे. कलेक्टर आंबा ८० ते १०० रूपये किलो असून गावठी आंबे ३० ते ३५ रूपये किलो दराने येथे उपलब्ध आहे. मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे आंब्याचे दर दररोज चढ-उतार होत आहे. सिरोंचा येथे बाहेरून येणारे नागरिक खासकरून कलेक्टर आंबा खरेदी करण्यासाठी लगबग करीत आहे. या बाजारात अनेक बाहेरच्या ग्राहकांना भाषेची अडचण प्रकर्षाने जाणवते. सिरोंचाचा हा आंबा बाजार गेल्या अनेक वर्षापासून सतत गजबजत राहतो, अशी माहिती येथील जुने नागरिक आवर्जुन देतात. या बाजारात सिरोंचा तालुक्यातील मोठ्या अमरायामधून आंबे विक्रीला आणले जातात. यातील बरेच आंबे हे पारंपरिक पद्धतीने पिकविलेले असतात, अशी माहिती विक्रेत्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. (तालुका प्रतिनिधी)
कलेक्टरसह विविध प्रजातीच्या आंब्यांची आवक वाढली
By admin | Updated: May 16, 2015 01:59 IST