लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालुक्यातील शिक्षकांना त्रास सहन करावा लागला. अशा प्रकारचे नियोजन शून्य प्रशिक्षण यापुढे घेऊ नये, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे.सदर निवेदन शिक्षणाधिकारी माध्यमिक रमेश उचे यांनी स्वीकारले. यावेळी विमाशिसंचे अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, जिल्हा कार्यवाह अजय लोंढे, सुरेंद्र मामिडवार, शेमदेव चापले, रवींद्र बांबोळे, यशवंत रायपुरे, रेवनाथ लांजेवार, दिगांबर कोटगले, मंगेश भैसारे आदींसह शिक्षक उपस्थित होते.सदर निवेदन हे आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांना शिक्षणाधिकाºयांमार्फत पाठविण्यात आले आहे. निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, मानव संसाधन विकास मंत्रालय व एनसीईआरटी यांच्याद्वारे इयत्तानिहाय निश्चित करून दिलेल्या क्षमतांमध्ये विद्यार्थ्यांची संपादणूक वाढविण्याच्या उद्देशाने विद्या प्राधिकरण पुणे यांच्या मार्फत राज्यभरात एकाचवेळी उद्बोधन कार्यक्रमाचे आयोजन सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस करण्यात आले. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान व सामजिकशास्त्राचे अध्यापन करणारे शिक्षक व मुख्याध्यापक यांचे सहा गटांमध्ये एका दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. सदर प्रशिक्षणाची संपूर्ण जबाबदारी डीआयईसीपीडी यांच्या प्राचार्यांकडे शासनाने सोपविली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यात प्रशिक्षण केंद्र निश्चित करताना भौगोलिक परिस्थितीचा विचार करण्यात आला नाही, हे स्पष्ट होते, असे विमाशिसंने म्हटले आहे.आरमोरी प्रशिक्षण केंद्रावर आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा व कोरची या तालुक्यातील शाळांचा समावेश करण्यात आला होता. यात आरमोरीपासून कोरची तालुक्याचे अंतर जवळपास १०० किमी आहे. त्यामुळे कोरची तालुक्यातील शिक्षकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. अहेरी केंद्रावर प्रशिक्षणासाठी येणाऱ्या सिरोंचा तालुक्यातील शिक्षकांना १५० किमीचे अंतर गाठून शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. काही प्रशिक्षण केंद्रावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आलेली नव्हती. प्रत्येक प्रशिक्षणार्थी शिक्षकांना जेवणाचे डबे सोबत आणण्याच्या सूचना पत्रान्वये देण्यात आल्या होत्या, असे म्हटले आहे. आर्थिक तरतूद नसताना प्रशिक्षण का घेण्यात आले, असा सवाल विमाशिसंने केला आहे.
नियोजनशून्य प्रशिक्षणाचा शिक्षकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:21 IST
एनसीईआरटीने दिलेले विद्यार्थी गुणवत्तेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे उद्बोधन कार्यक्रमाअंतर्गत प्रशिक्षण घेण्यात आले. मात्र डीआयईसीपीडी यांच्या वतीने योग्य नियोजन करण्यात न आल्याने सिरोंचा व कोरची तालुक्यातील शिक्षकांना त्रास सहन करावा लागला.
नियोजनशून्य प्रशिक्षणाचा शिक्षकांना फटका
ठळक मुद्देविमाशिसंचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : स्थळ चुकीचे दिल्याने २०० किमीची पायपीट