अहेरी : येथील बसस्थानकावर आज सकाळी ११.३० वाजता बेवारस स्थितीत दारूसाठा आढळून आला. पोलिसांनी हा दारूसाठा जप्त केला आहे. अहेरी बसस्थानकावर नागपूरवरून अहेरीकडे आलेली बस क्रमांक एचएच-४०-एन-९९९३ ही बस सकाळी ११ वाजता पोहोचली. बसमधील सर्व प्रवाशी उतरले. एक अनोळखी २४-२५ वर्ष वयाचा युवक काळ्या रंगाची बॅग घेऊन उतरत असताना तेथील स्थानकातील एका चालकाने त्याला बॅगमध्ये काय आहे, असे विचारले. त्यानंतर सदर युवक बॅग फेकून देऊन तेथून धावत निघून गेला. त्यानंतर बसचालक शिव गोविंद यादव व वाहक निशांत शेख यांनी सदर माहिती बसस्थानक प्रमुख तुकाराम चौधरी यांना दिली. त्यांनी सदर बॅग तपासली असता, त्यात दारूच्या शिश्या आढळून आल्या. तत्काळ आगार व्यवस्थापक एफ. के. राखुंडे यांनी याची माहिती अहेरी पोलीस ठाण्याला दिली. तत्काळ पोलीस विभागाने घटनास्थळ गाठून दारू जप्त केली. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक फिरोज मुळजी करीत आहेत. या घटनेनंतर बसस्थानकावर नागरिकांची गर्दी झाली होती. (शहर प्रतिनिधी)
अहेरी बसस्थानकावर बेवारस दारुसाठा जप्त
By admin | Updated: March 13, 2015 00:10 IST