गडचिरोली : २०१२-१३ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील आश्रमशाळांना अतिरिक्त ब्लँकेटचा पुरवठा आदिवासी विकास विभागाच्या मार्फतीने करण्यात आला होता. त्यापैकी ३ हजार १८७ ब्लँकेट परत २१ फेब्रुवारी रोजी परत नेले आहेत. आश्रमशाळेतील बीपीएलधारक विद्यार्थ्यांना ब्लँकेटचा पुरवठा करण्यासाठी यादी मागविण्यात आली होती. तरीही विद्यार्थ्यांपेक्षा जवळपास दुप्पटपटीने ब्लँकेट उपलब्ध करून देण्यात आले. अतिरिक्त ब्लँकेट आश्रमशाळा व प्रकल्प कार्यालयाच्या गोदामामध्ये ठेवण्यात आले होते. त्यापैकी २ हजार ५५० ब्लँकेट मुरूमगाव आश्रमशाळेतून तर ६३७ ब्लँकेट प्रकल्प कार्यालयाच्या गोदामातून परत नेण्यात आले आहेत. सदर ब्लँकेट दोन वर्षांपासून आश्रमशाळेमध्ये होते. अनेक ब्लँकेट कुजले आहेत. तर काही ब्लँकेट उदरांनी कुरतडले आहेत. त्यामुळे ते वापरण्या योग्य नाही. तरीही सदर ब्लँकेट दुसऱ्या प्रकल्प कार्यालयातील विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार असल्याची माहिती आहे. यापूर्वीही हजारो ब्लँकेट परत नेण्यात आले आहेत. आदिवासी विकास विभागाच्या गलथान कारभारामुळे व चुकीच्या नियोजनामुळे लाखों रूपयांचा चुराडा झाला आहे. (नगर प्रतिनिधी)
दोन वर्षांपूर्वी पुरविलेले ब्लँकेट नेले परत
By admin | Updated: February 22, 2015 01:15 IST