घोेटच्या वळणावर घडला प्रकार : चोरीचा प्रयत्न केल्याने पाच वर्षांची शिक्षागडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोटनजीकच्या वळणावर पैशासाठी चाकूने वार करून कापूस व्यापाऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपी ट्रकचालक व क्लिनरला गडचिरोलीच्या जिल्हा प्रमुख सत्र न्यायालयाने जन्मठेप व बळजबरीने चोरीचा प्रयत्न केल्याच्या कलमाअंतर्गत दोन्ही आरोपीला पाच वर्षांची शिक्षा बुधवारी सुनावली.ट्रकचालक कैलास राठोड व क्लिनर अप्पाजी गाडे असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मनोहर कोरडे, रूपराव कोरडे, महादेव कठाणे तिघेही रा. नरखेड जि. नागपूर हे कापूस खरेदीचा व्यवसाय भागीदारीत करीत होते. ३१ मार्च २०१४ रोजी हे तिनही कापूस व्यापारी सिरोंचा येथे ट्रक एमएच-४०-एन-६६८१ ने सिरोंचाकडे निघाले. यावेळी ट्रकचालक म्हणून कैलास राठोड व क्लिनर अप्पाजी गाडे हे ट्रकमध्ये त्यांच्यासोबत होते. रूपराव कोरडे हे ट्रकचालक व क्लिनरसोबत कॅबिनमध्ये होते. तर महादेव कठाणे व मनोहर कोरडे हे ट्रकच्या मागील भागात बसले होते. रात्री ३.३० वाजताच्या सुमारास सदर ट्रक घोट वळणाजवळ आल्यावर ट्रकचालक राठोड याने ट्रक थांबविला. दरम्यान ट्रकचालक राठोड व क्लिनर गाडे या दोघांनी चाकूने वार करून रूपराव कोरडे यांची हत्या केली. सदर कृत्य होताना महादेव कठाणे यांनी दरवाजातून कॅबिनमध्ये पाहिले. त्यावेळी राठोड याने कठाणेवर मिरचीपावडर भिरकावली. त्यानंतर तो मागे येऊन रक्कम द्या नाही तर तुम्हाला सुद्धा ठार करीन, अशी धमकी दिली. त्यानंतर कठाणेवर चाकुने वार केल्याने तो जखमी झाला. त्यानंतर ट्रकचालक व क्लिनरने ट्रक तिथेच सोडून पळ काढला. या घटनेची तक्रार मनोहर कोरडे यांनी अहेरी पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींवर भादंविचे कलम ३०२ (३४) व ३९३ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी या खटल्यात साक्षी पुरावे तपासून व दोेन्ही बाजुच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दोन्ही आरोपीला दोषी ठरवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यावेळी सहायक सरकारी अभियोक्ता सचिन कुंभार यांनी काम पाहिले. (जिल्हा प्रतिनिधी)
हत्या करणाऱ्या दोन आरोपीस जन्मठेप
By admin | Updated: May 5, 2016 00:11 IST