एसबीआय अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा : चातगावची रक्कम धानोराच्या शाखेत गडचिरोली : धानोरा तालुक्याच्या चातगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या विम्याची रक्कम चातगाव एसबीआय बँकेमध्ये जमा न करता सदर रक्कम धानोरा येथील एसबीआयच्या शाखेत जमा झाली. त्यामुळे चातगावच्या शेतकऱ्यांना विम्याच्या रकमेसाठी सुमारे दोन महिने पायपीट करावी लागत आहे. एसबीआयच्या या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात चातगाव येथील एसबीआय शाखेतून ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. या परिसरात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांसाठी २४ लाख ९२ हजार २५३ रूपये एवढी रक्कम विमा कंपनीने मंजूर केली. एसबीआय वगळता इतर बँकांकडून विमा काढलेल्या शेतकऱ्यांची विम्याची रक्कम दोन महिन्यांपूर्वीच मिळाली. इतर बँकांमध्ये विम्याची रक्कम मिळायला लागल्यानंतर चातगाव एसबीआय शाखेत विम्याच्या रकमेसाठी शाखेत विचारणा सुरू केली. मात्र विम्याची रक्कम अजुनपर्यंत प्राप्त झाली नसल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठविले जात होते. सातत्त्याने बँकेचा उंबरठा झिजविणाऱ्या शेतकऱ्यांचा संयम सुटला व शेतकऱ्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांसोबतच बाचाबाची करण्यास सुरूवात केली. तेव्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना जाग आली. त्यानंतर चातगाव व गडचिरोली येथील बँक व्यवस्थापकांनी विमा कंपनीकडे याबाबतची शहानिशा केली असता, सदर रक्कम नांदेड येथील एसबीआय बँक शाखेत चुकीने जमा झाली असल्याचे निदर्शनास आले. पाठपुराव्यानंतर सदर रक्कम गडचिरोली येथील एसबीआय शाखेमध्ये वळती करण्यात आली. गडचिरोली शाखेतूनसुद्धा विम्याची रक्कम चातगावच्या शाखे ऐवजी जमा न करता ती रक्कम धानोरा येथील एसबीआयच्या शाखेमध्ये जमा केली. सदर रक्कम धानोरा येथील शाखेत १२ जुलैपासून पडून होती. एवढा उशिर होऊनही विमा रकमेचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आल्यानंतर रकमेची शोधाशोध करण्याचे काम सुरू झाले. गडचिरोली येथील मुख्य एसबीआय शाखेकडे याबाबतची तक्रार काही शेतकऱ्यांनी केल्यानंतर रक्कम चातगाव ऐवजी धानोरा येथील शाखेत जमा झाल्याचा साक्षात्कार बँक कर्मचाऱ्यांना झाला. त्यानंतर धानोरा येथील एसबीआय शाखेत विम्याची रक्कम चातगाव एसबीआयमध्ये वळती करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या सर्व बाबीमध्ये विम्याची रक्कम मिळण्यास तब्बल दोन महिन्यांचा उशीर झाला आहे. हीच रक्कम शेतकऱ्यांना रोवणीच्या हंगामापूर्वी मिळाली असती तर शेतकऱ्यांसाठी सोयीचे झाले असते. बँक कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदार वर्तणुकिमुळे विमा रक्कम मिळण्यास तब्बल दोन महिन्यांचा विलंब झाला आहे. यासाठी जबाबदार असलेल्या बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. दोन महिने शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे त्यावरचे व्याज शेतकऱ्यांना देण्यात यावे. व्याजाची रक्कम संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आहे.चातगाव परिसरातील शेतकऱ्यांची विम्याची रक्कम नांदेड जिल्ह्यात चुकीने गेली होती. ही रक्कम परत आणण्यात आली. तलाठ्याने चातगाव परिसरातील शेतकऱ्यांचा सर्विस एरिया धानोरा दाखविल्याने ही रक्कम धानोरा शाखेत जमा झाली. सदर चुक लक्षात आल्यानंतर दोन दिवसांपूर्वी धानोरा शाखेला पत्र देऊन विम्याची रक्कम चातगाव शाखेत जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील तीन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होईल.- सूर्यकांत फाळके, व्यवस्थापक, एसबीआय गडचिरोली.
शेतकऱ्यांची विम्यासाठी दोन महिने पायपीट
By admin | Updated: August 24, 2016 02:18 IST