तालुका निर्माण करा : भामरागड-आलापल्ली मार्गावरची वाहतूक ठप्पपेरमिली : अहेरी तालुक्यातील पेरमिली परिसराच्या समस्यांकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने या भागातील समस्या वाढत आहे. अनेकदा तालुका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही या भागाच्या समस्या सुटलेल्या नाही. त्यामुळे पेरमिली येथे स्वतंत्र तालुका निर्माण करावा, या प्रमुख मागणीसह आठ मागण्यांना घेऊन बुधवारी दोन तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यामुळे आलापल्ली-भामरागड मार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनाचे नेतृत्व सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच साजन गावडे, श्रीकांत बंडमवार, प्रशांत ढोंगे, आशिफ पठाण, डॉ. दुर्गे, संपत डहागावकर, तुळशिराम चंदनखेडे, सत्यनारायण येगोलपवार, विनोद आत्राम, श्रीकांत दुर्गे आदींनी केले.पेरमिली परिसरात आठ ते दहा हजार आदिवासी बांधव वास्तव्याला असून या सर्व भागाची लोकसंख्या ३५ खेड्यात विखुरलेली आहे. खेड्यांना जोडण्यासाठी एकही पक्का रस्ता नाही. त्यामुळे वाहतुकीची सुविधा उपलब्ध नाही. जिल्ह्याच्या किंवा तालुका मुख्यालयासाठी जाण्यासाठी नागरिकांना १५ किमीची पायपीट करून पेरमिली येथून वाहन पकडावे लागते व अहेरी तालुका मुख्यालयासाठी जाण्यासाठी ४० किमीचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे पेरमिली तालुका निर्माण करण्यात यावा, तसेच पेरमिली येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र, वरिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात यावे, पाच वर्षांपासून रखडलेली पेरमिलीच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात यावे, पेरमिली येथे राष्ट्रीयकृत बँकेची शाखा तसेच औद्योगिक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे, प्रशासकीय भवनाचे तत्काळ उद्घाटन करावे, शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी दोन तास रस्ता रोखो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनामुळे भामरागड व आलापल्ली या दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने वाहनांची रांग लागली होती. त्यानंतर अहेरीचे तहसीलदार सिलमवार यांनी निवेदन स्वीकारून या मागण्या सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले. १० दिवसात या मागण्या न सुटल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. यापूर्वीही अनेकदा आंदोलन करून न्याय मिळाला नाही, असे त्यांनी लोकमतला सांगितले. (वार्ताहर)
पेरमिलीत दोन तास चक्काजाम
By admin | Updated: January 21, 2016 00:21 IST