न्यायालयाचा निर्णय : जातीवाचक शिवीगाळ व लैंगिक शोषण प्रकरणकुरखेडा : येथील गजानन कृषी केंद्राच्या जाळपोळ प्रकरणातील आरोपी महिलेच्या जातीवाचक शिवीगाळ व लैंगिक शोषण केल्याच्या तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी कृषी केंद्राचे संचालक भरत नामदेव बनपुरकर याचे विरूद्ध अनुसूचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदा व भादंविचे कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून बुधवारी अटक केली. त्यानंतर गुरूवारी कुरखेडा तालुका सत्र न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपी बनपूरकर याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जातीवाचक शिवीगाळ व लैंगिक शोषण केल्याची तक्रार पीडित महिलेने कुरखेडा पोलीस ठाण्यात बुधवारी दाखल केली. यात भरत बनपुरकर यांच्या गजानन कृषी केंद्रात गेल्या आठ वर्षांपासून कामावर असताना पत्नी म्हणून ठेवतो, असे खोटे आमिष दाखवून असहाय्यता व गरीबीचा फायदा घेऊन बनपूरकर याने आपल्यावर बलात्कार केला, असेही पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीवरून कुरखेडा पोलिसांनी भरत बनपूरकर याला अटक केली. दोन महिन्यापूर्वी येथील गजानन कृषी केंद्रास आग लागल्याने संपूर्ण कृषी केंद्र जळून खाक झाले होते. याबाबत पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस तपासात सदर आरोपी महिलेने सुड भावनेतून आग लावून दुकान पेटविल्याचा कबुली जवाब दिला होता व त्यानंतर या महिलेची कारागृहात रवानगी करण्यात आली होती. जामिनीवर सुटून येताच सदर महिलेने बुधवारी बनपूरकर यांच्या विरोधात लैंगिक शोषण बाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यामुळे आता कृषी केंद्र जाळपोळ प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास एसडीपीओ अभिजीत फस्के करीत आहेत.
आरोपीला दोन दिवसांचा पीसीआर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 01:38 IST