रोहयोतून बोडीचे खोदकाम : शेतकऱ्याला मागितली होती लाचएटापल्ली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतामध्ये बोडी मंजूर झाल्याचे भासवून एटापल्ली तालुक्यातील एका शेतकऱ्याला पंचायत समिती कार्यालयातील नरेगाचे तांत्रिक अधिकारी रवी व्यंकटस्वामी कोंडावार यांनी पाच हजार रूपयांची मागणी केली होती. ते स्वीकारताना त्याला २८ एप्रिल रोजी कार्यालयातच रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर त्याला गडचिरोली येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एटापल्ली तालुक्याच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बोडी मंजूर झाल्याचे भासवून जानेवारी २०१६ मध्ये पंचायत समिती एटापल्ली येथील नरेगाचे तांत्रिक अधिकारी रवी कोंडावार याने कार्यालयीन सहकाऱ्यांसह तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतात जाऊन बोडी तयार करण्यासाठी खोदकामाची आखणी करून दिली. त्यानंतर खोदकाम करण्यास सांगितले. यावरून तक्रारदाराने शासकीय योजनेचा लाभ घेण्याच्या उद्देशाने १५ दिवस मजुराकडून बोडीचे खोदकाम केले. बोडीचे खोदकाम केलेल्या मजुराची मजुरी द्यावयाची असल्याने शेतकरी पंचायत समिती एटापल्ली येथे जाऊन रवी कोंडावार यांना भेटून मजुरीबाबत विचारणा करू लागले. तेव्हा आम्ही प्रत्यक्षात शेतात येऊन बोडीच्या खोदकामाची पाहणी केल्यानंतर पैसे मंजूर करून देतो, असे सांगितले. परंतु आजपर्यंत एटापल्ली पंचायत समिती येथून कुणीही अधिकारी बोडीची पाहणी करण्यासाठी आले नाही. त्यानंतर शेतकऱ्याने रवी कोंडावार यांची भेट घेतली. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत शेतामध्ये खोदलेल्या बोडी खोदकामाचे मोजमाप करून बिल मंजूर करून देण्याच्या कामासाठी रवी कोंडावार याने पाच हजार रूपयांची मागणी केली. मात्र तक्रारदार शेतकऱ्यास त्याला पैसे द्यावयाचे नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली यांच्याकडे २६ एप्रिल रोजी तक्रार दाखल केली व एसीबीच्या अधिकाऱ्यांनी २७ व २८ एप्रिल रोजी सापळा रचला व प्रत्यक्ष पाच हजारांची लाच घेताना २८ एप्रिल रोजी आरोपी रवी कोंडावारला अटक करण्यात आली. त्याच्या विरूद्ध कलम ७/१३ (१) (ड) सह १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा सन १९८८ अन्वये गुन्हा एटापल्ली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. २९ एप्रिल रोजी दुपारी १.४६ वाजताच्या सुमारास आरोपीला अटक करून विशेष न्यायालय गडचिरोली येथे त्याला हजर करण्यात आले. न्यायालयाने ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.सदर कारवाई एसीबीचे पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, एम. एस. टेकाम यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार विठोबा साखरे, नायब पोलीस शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकवार, पोलीस हवालदार मिलींद गेडाम, महेश कुकुडकर, प्रदीप चवरे यांनी पार पाडली. (तालुका प्रतिनिधी)
लाचखोरास दोन दिवसांची पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2016 01:25 IST