सिरोंचा : प्राणहिता नदीपात्रातून तराफ्याच्या सहाय्याने सागवान पाट्यांची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याच्या आधारे क्षेत्रसहाय्यक व वनरक्षकांनी धाड टाकून सव्वा लाख रूपयांचे २८ नग सागवान पाट्या जप्त केल्याची घटना शुक्रवारच्या मध्यरात्री कारसपल्ली येथील प्राणहिता नदीघाटावर घडली. सिरोंचा वन परिक्षेत्रांतर्गत कारसपल्ली गावानजीक प्राणहिता नदीघाटावरून तीन बैलबंड्यांच्या सहाय्याने ४५ सागवान नग पाट्या आंध्रप्रदेशात नेले जात असल्याची गुप्त माहिती कारसपल्लीचे क्षेत्रसहाय्यक एस. एस. येनगंटीवार यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीच्या सुमारास प्राणहिता नदीघाटाच्या परिसरात गस्त घातली. दरम्यान एका बंडीसह २८ नग सागवान पाट्या वन कर्मचाऱ्यांना हाती लागले. दोन बंड्या व बैलांसह उर्वरित सागवान माल घेऊन वनतस्कर फरार झाले. वन कर्मचाऱ्यांनी जप्त केलेला माल वन विभागाच्या बोटीद्वारे पहाटेच्या सुमारास सिरोंचा नदीघाटावर आणला. दरम्यान बोटीवर वजन अधिक झाल्याने काही सागवान पाट्या नदीपात्रात पडल्या. वन कर्मचाऱ्यांनी सर्व सागवान पाट्या एकत्रित करून वन विभागाच्या निस्तार डेपोत जमा केल्या. सदर कारवाई वन परिक्षेत्राधिकारी ए. डी. करपे यांच्या मार्गदर्शनात कारसपल्लीचे क्षेत्रसहाय्यक एस. एस. येनगंटीवार, सिरोंचाचे क्षेत्रसहाय्यक आर. बी. तुम्मावार, वनरक्षक एल. एम. शेख, एस. एम. पवार, वाहनचालक समीर शेख व वन मजुरांनी केली.
सव्वा लाखांच्या सागवान पाट्या जप्त
By admin | Updated: March 8, 2015 00:51 IST