लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायतीअंतर्गत नारगुंडा गावात दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र सदर नळ योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने सदर पाणीपुरवठा योजना गेल्या दोन महिन्यांपासून बंद पडली आहे. परिणामी गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. प्रशासनाने या कामाची चौकशी करावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.नारगुंडावासीयांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, तसेच पाणीटंचाई दूर व्हावी या उद्देशाने शासनाच्या निधीतून ग्रामपंचायतीमार्फत नारगुंडा येथे गोटूलजवळ विद्युतवर चालणारी दुहेरी नळ योजना मंजूर करण्यात आली. सदर योजना गावातील हातपंपावर मोटार बसवून कार्यान्वित करण्यात आली. चार ते पाच ठिकाणी सार्वजनिक नळ बसवून ही योजना सुरू करावयाची होती. गेल्या चार-पाच वर्षांपूर्वी कंत्राटदारामार्फत हातपंपावर मोटार बसवून टाकी उभारण्यात आली. मात्र चार वर्षानंतरही ही योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. तत्कालीन ग्रामसेवकांनी सदर योजनेचे काम कागदावर दाखवून याचा निधी हडप केला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.यंदाच्या मे महिन्यात सदर योजना दुरूस्तीसाठी निधी मंजूर झाला. त्यानंतर या निधीतून या योजनेची थातुरमातूर दुरूस्ती करून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांची तक्रार असूनही ग्रामपंचायत प्रशासनाने या योजनेच्या कामाकडे लक्ष दिले नाही. परिणामी दोन महिन्यात सदर नळ योजना बंद पडली.
नारगुंडातील नळ योजना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 23:14 IST
तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायतीअंतर्गत नारगुंडा गावात दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली.
नारगुंडातील नळ योजना बंद
ठळक मुद्देदोन महिने उलटले : बांधकामाची चौकशी करण्याची मागणी