तुळशी : देसाईगंज तालुक्यातील तुळशी येथील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकावर तुडतुडा रोगाने हल्ला केल्यामुळे परिसरातील धानपीक संकटात सापडले आहे. ऐन कापणीला आलेले धानपीक तुडतुडा रोगामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तुळशी येथील शेतकरी काशिराम नाकाडे यांच्या शेतातील तीन एकर धानपिकावर तुडतुडा रोगाने हल्ला केल्यामुळे कापणीला आलेले धानपीक संकटात सापडले आहे. काही दिवसातच धानपिकाची कापणी होणार होती. परंतु अवकाळी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांसमोर धानपीक बचावासाठी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. काशिराम नाकाडे यांनी तीन एकरमध्ये धान रोवणी केली. रोवणीपासून आजपर्यंत त्यांना जवळपास ४० हजार रूपये खर्च करावे लागले आहे. मात्र तुडतुडा रोगाने त्यांच्या धानपिकाला ग्रासले असल्याने काय उपयायोजना कराव्या, असा प्रश्न नाकाडे यांच्यासमोर निर्माण झाला आहे. तुळशी येथील अन्य शेतकऱ्यांच्या धानपिकाचीही स्थिती एकसारखीच आहे. अनेक शेतकऱ्यांनी हलक्या धानपिकाची कापणी सुरू केली आहे. परंतु जड धानपीक मुदतीत असल्याने काही दिवस पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार आहे. तुडतुडा रोग एका शेतातून दुसऱ्या शेतात पसरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सध्या पिकाच्या संरक्षणासंदर्भात भीतीचे वातावरण आहे.तुळशी, कोकडी या परिसरात मोठ्या प्रमाणात धानपिकाचे उत्पादन शेतकरी घेतात. त्यामुळे या परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची उपजीविका शेती व्यवसायावर अवलंबून आहे. यामुळे तुळशी येथील धानपिकाच्या नुकसानीची चौकशी करून त्वरित नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी तुळशी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे. (वार्ताहर)
तुळशीत धानावर तुडतुड्याचा हल्ला
By admin | Updated: October 25, 2014 22:40 IST