गडचिरोली : शहरात नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र मागील अनेक दिवसांपासून अनेक वॉर्डांमध्ये नारूयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. असाच प्रकार १७ एप्रिल रोजी सायंकाळी कॉम्प्लेक्स परिसरातील दिलीप बोंडसे यांच्या शासकीय निवासस्थानात घडला. बोंडसे यांच्या नळातून जवळपास नऊ इंच लांबीचा नारू आढळून आला. त्यामुळे पुन्हा एकदा नगर परिषद प्रशासनाचा बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.कॉम्प्लेक्स परिसरातील दिलीप बोंडसे यांच्या डी/५३ निवासस्थानातील नळातून नऊ इंच लांबीचा नारू आढळून आला. नगर परिषद प्रशासनाच्या वतीने दरवर्षी वर्षाअखेर १२०० रूपयांच्या आसपास पाणीकर आकारत असते. मात्र त्याबदल्यात स्वच्छ व निर्जंतुक पाणीपुरवठा केला जात नाही. अनेक वर्षांपासून पाईपलाईन फुटून खराब झाली आहे. मात्र त्याची दुरूस्ती न. प. च्या वतीने अद्यापही करण्यात आली नाही. परिणामी कॉम्प्लेक्स परिसरात शासकीय निवासस्थानांमध्ये दूषित व नारूयुक्त पाण्याचा पुरवठा केला जात आहे. त्यामुळे या परिसरातील कर्मचारी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेने शहरात स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी कर्मचारी व नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)
शासकीय निवासस्थानात नळातून नारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2015 01:38 IST